जि.प.सदस्य ते आरोग्यमंत्री : ना.राजेशभैय्या टोपे यांचा थक्क करणारा प्रवास :जागतिक स्तरावर दखल

संपादकीय
१५ ऑगस्ट १९९२ रोजी अंबड चे विभाजन होऊन नवीन घनसावंगी तालुक्याची निर्मिती झाली. तेव्हा घनसावंगी तालुका कृती समितीच्या वतीने जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात, आयोजित केलेल्या कार्यक्रमास जालना जिल्ह्यातील महत्त्वाचे राजकीय पुढारी उपस्थित होते.जवळपास सर्वच पक्षांचे जिल्हाध्यक्ष हे अंबड-घनसावंगी तालुक्यातील असल्यामुळे प्रत्येकाच्या मनात आनंद निर्माण झाला होता.सर्व जनतेच्या चेहऱ्यावर तो दिसत होता.नवीन तालुक्याच्या चौफेर विकासासाठी सगळी नेतेमंडळी कटिबद्ध होती. सगळ्यांनीच आपापल्या भाषणात त्याचा उल्लेख केला.
अॅड.अंकुशरावजी टोपे साहेब हे जालना जिल्ह्याचे खासदार असल्यामुळे ते या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते, त्यांनी युवकांचे नेतृत्व करणारे राजेशभैय्या टोपे यांनाही सोबत आणले होते. तेव्हा हा कार्यकर्ता पुढे घनसावंगी मतदारसंघाचा सलग पाच वेळा आमदार आणि महाराष्ट्राच्या आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याचा कॅबिनेट मंत्री होईल असे भविष्य जर कुणी वर्तविले असते, तर त्यावर लोकांचा विश्वासही बसला नसता.जे लोकांना स्वप्नातही वाटले नव्हते. ते राजेशभैय्या टोपे साहेब यांनी सत्यात उतरवले. कालाय तस्मै नमः म्हणतात ते यालाच.
त्यावेळी राजेशभैय्या हे तत्कालीन मराठवाडा विद्यापीठ व आताच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबादच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य होते. संस्थाचालकांचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी त्यावेळी व्यवस्थापन परिषदेमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटविला. वेगवेगळ्या शाखेतील उच्च विद्याविभूषित मंडळींबरोबर काम करण्याची संधी मिळाली. लोकसंपर्क वाढतच गेला. प्रत्येकाशी हसतमुख राहून संपर्कात आलेल्या माणसांची, नागरिकांची कामे केली. विद्यापीठ विकासाच्या चर्चेत भाग घेऊन ते आपली पुढची दिशा निश्चित करीत होते,राजकीय इमारतीची पायाभरणी करीत होते.
पाहता-पाहता पंचवीस-तीस वर्षाचा काळ निघून गेला आणि राजेशभैय्या टोपे हे घनसावंगी मतदार संघाचे सलग पाच वेळा विद्यमान आमदार आणि प्रथमतः नगरविकास,उर्जा, उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे कॅबिनेट मंत्री व आता २०१९ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते आमदार म्हणून निवडून आले.मा. खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सहकार्याने व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे साहेब यांच्या मंत्रीमंडळात भैय्यासाहेब राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याचे कॅबिनेट मंत्री झाले.तसेच मा.मुख्यमंत्र्यांनी जालना जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांच्यावर जबाबदारी सोपवली.
या सर्व आनंदात कर्मयोगी अंकुशरावजी टोपे साहेब हे असते तर बरं वाटलं असतं. परंतु काळाला ते मान्य नव्हतं. खुप लवकर अंकुशरावजी टोपे साहेब हे आपल्यातून निघून गेले.
त्यांच्या पश्चात जनतेने राजेशभैय्या टोपे साहेब यांच्यावर भरभरून प्रेम केले.कालच्या विधानसभा निवडणुकीत घनसावंगी मतदार संघातील जनतेने त्यांच्यावर भरभरुन प्रेम करत त्यांना पाचव्यांदा निवडून आणले. याच्या पाठीमागे त्यांची जिद्द, मेहनत, सतत सोळा- सोळा तास परिश्रम करण्याची तयारी यामुळे हे सर्व शक्य झाले. शिवाय लोकांचे प्रेम आणि आशीर्वादही लाभले. उमद्या व्यक्तिमत्वाचं अभिष्टचिंतन करायला कोण पुढे येणार नाही? आज सर्व स्तरातून त्यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे, भविष्यात ते वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राहायला जावोत, हीच अपेक्षा.
वडील अॅड.अंकुशरावजी टोपे हे वकीली व्यवसायाच्या निमित्ताने औरंगाबाद येथे राहत होते, तिथेच श्री. राजेश टोपे यांचा ११ जानेवारी १९६९ रोजी जन्म झाला. त्यांचे मुळ गाव अंबड तालुक्यातील पाथरवाला (बु.)हे आहे. त्यांना राजकारणाचे बाळकडू अगदी लहान वयात घरातच मिळाले. वडील श्री. अंकुशराव टोपे हे जिल्हा परिषद सदस्य, आमदार व पुढे खासदार होते. त्यांच्यासोबत यावेळी विद्यार्थ्यांच्या, युवकांच्या चळवळीत राजेशभैय्या काम करू लागले. अशातच समर्थ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन झाले.तसेच युवक काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीसपदी काम करतांना प्रथम झिरपी सर्कलमधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.
प्रत्येक काम जोमाने, उमेदीने करू लागले.लोकांच्या कामासाठी त्यांनी स्वतःला समाजकारणात झोकून घेतले.वडिलांचा वरदहस्त व आशीर्वाद होताच, त्यांच्या अनुभव व मार्गदर्शनाखाली काम सुरू केले. अशातच खासदार शरदराव पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.अॅड.अंकुशराव टोपे व श्री.राजेशभैय्या टोपे हे राष्ट्रवादीत पवार साहेबांच्या सोबत आले आणि महाराष्ट्रात पक्षाचे सामर्थ्य वाढविण्यासाठी श्री. पवार यांच्या खांद्याला खांदा लावून पक्ष वाढीसाठी काम करू लागले. पिता-पुत्राने झपाटल्या सारख्या केलेल्या या प्रचंड कामामुळे श्री. पवार यांनी १९९९ मध्ये श्री. राजेशभैय्या टोपे या उमद्या व्यक्तिमत्त्वाला अंबड विधानसभेसाठी राष्ट्रवादीची पहिल्यांदा उमेदवारी दिली. तेव्हा त्यांच्या कामाची पावती म्हणून जनतेने राजेशभैय्या टोपे यांना प्रचंड मतांनी निवडून दिले. आमदार केले. १९९९ ते २००४ पुढे २००४ ते २००९ पुढे २००९ ते२०१४ पुढे २०१४ ते २०१९ व आता २०१९ लाही विधानसभेत पाठविले.
विजयाची पताका सलग पाचव्यांदा फडकावली. या मतदारसंघात सलग पाच वेळा निवडून येणारा आमदार असा इतिहास घडविला. राष्ट्रवादी पक्षाने प्रथमत: राज्यमंत्री व नंतर कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद देऊन त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी टाकली. आज मा.नामदार राजेशभैय्या टोपे साहेब हे महाराष्ट्राचे माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तसेच सध्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याचे कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद सांभाळत आहेत. तसेच जालना जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही ते कार्यभार सांभाळत आहेत.
आता घनसावंगी मतदारसंघ (पूर्वीचा अंबड मतदारसंघ) आणि राजेशभैय्या टोपे साहेब हे समीकरणच झालेलं आहे.तसेच शब्दकोषातील मंत्री हा शब्द त्यांना सोडायलाच तयार नाही. जनमताने त्यांचे वर्चस्व निर्विवाद मान्य केले आहे, यात शंका नाही.
त्यांच्याच प्रयत्नाने तालुक्यात आणि जिल्ह्यातही वेगवेगळ्या संस्था कार्यरत आहेत. नामदार टोपे हे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून पुढे येत असून त्यांनी वयाच्या तिसाव्या वर्षी विधानसभेत पहिले पाऊल ठेवले आणि आज ते घट्ट रोवले आहे एवढे मात्र निश्चित.
मृदू स्वभाव, उमदं व्यक्तिमत्व, एक तळमळीचा कार्यकर्ता, विरोधकांचेही काम करणारा, त्यांच्या बाबतीतही सतत सकारात्मक दृष्टिकोन बाळगणारे, अशी त्यांची सध्यातरी ओळख आहे.
स्वतःच्या मोठेपणाचा, यत्किंचितही अहंभाव नसलेला भैय्यासाहेबांसारखा कार्यकर्ता शोधूनही सापडणे कठीण आहे. त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबली पाहिजे ही भूमिका घेतली. समाज परिवर्तनासाठी शिक्षण हे आवश्यक आहे हे लक्षात घेऊन उच्च शिक्षण हे तळागाळापर्यंत गेले पाहिजे हा आग्रह धरला. यामागे जनता शिकली पाहिजे, उच्चशिक्षित झाली पाहिजे हाच विचार होता.
उच्चशिक्षणात महाराष्ट्राचे नेतृत्व करीत असताना त्यांना अनेक ठिकाणी जाण्याचा योग आला. यामध्ये आख्खा महाराष्ट्र तर पायाखाली घातलाच परंतु परदेशातील विद्यापीठांमध्ये जाऊन उच्च शिक्षणातील बदलाची नोंद घेतली. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे हे त्रिवार सत्य. परंतु ते समाजाशी निगडित व व्यवसायाभिमुख असावे यावरही त्यांनी भर दिला. तसेच उच्च शिक्षणात आमूलाग्र बदल करण्याचा प्रयत्न केला.
यू. जी.सी.ने मराठवाड्यातील उच्च शिक्षणात बदल घडविण्यासाठी हिंगोली व जालना येथे दोन आदर्श महाविद्यालये (माॅडेल काॅलेज) दिली.नामदार राजेश भैय्या टोपे साहेब यांनी केंद्र सरकारचे जालना जिल्ह्यातील हे महाविद्यालय घनसावंगी येथे खेचून आणले. त्यामुळे उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात घनसावंगी चे नाव भारताच्या नकाशावर झळकले. आज या मॉडेल कॉलेजची इमारत पाहिल्यानंतर आपण औरंगाबाद, पुणे, मुंबई किंवा दिल्ली या ठिकाणी आहोत की काय? असा भास निर्माण होतो. हे केवळ नामदार भैय्यासाहेबांमुळेच शक्य झाले. माॅडेल काॅलेज न्यायालयीन लढाईंसह अनंत अडचणींचा सामना करुन घनसावंगीला आणले; त्यांनी तहसिल, आय. टी.आय.,वसतीगृह, न्यायालय,रुग्णालय अशा एक ना अनेक प्रशासकीय इमारती घनसावंगीत निर्माण केल्या. त्याच इमारतींमधून २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत विजयी झाल्याचे प्रमाणपत्र भैय्यासाहेबांनी स्विकारले. योगायोग म्हणतात ते यालाच. आणि भैय्यासाहेबांच्या नशिबाने, कर्तृत्वाने व जनता- जनार्दनाच्या आशिर्वादाने याच इमारतीच्या सभागृहातून महाराष्ट्राच्या विधानभवनात भैय्यासाहेबांना पाचव्यांदा पाठविले.
विधी विद्यापीठ औरंगाबाद येथे तर मॉडेल कॉलेज घनसावंगी येथे आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
पाणी हेच जीवन असे समजून त्यांनी तालुक्यात अनेक ठिकाणी गोदावरी नदीवर बॅरेजेस बांधले. पाणी अडवून विकास गंगा सर्व तालुकाभर फिरविली. आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक अभ्यासू नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. पक्षाच्या बैठकीत, विद्यापीठाच्या समारंभात, उद्योजकाच्या कार्यक्रमात आणि शेतकऱ्यांच्या मेळाव्यात भैय्यासाहेबांचे भाषण अभ्यासपूर्ण असते. विधिमंडळात उत्कृष्ट संसदपटू म्हणून मान्यता पावलेल्या, वेगवेगळ्या प्रश्नांची जाण असलेला, त्या प्रश्नांविषयी पोटतिडकीने बोलणारा नेता सध्या तरी विरळच होय.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने स्टार प्रचारक म्हणून त्यांच्यावर जबाबदारी दिली होती. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राजेशभैय्यांची घनसावंगी मतदार संघाला, जालना जिल्ह्याला, राष्ट्रवादी पक्षाला आणि महाराष्ट्राला गरज असल्याचे नमूद केले होते, हे विशेष.
आज भैय्यासाहेबांकडे सर्व सामान्य माणसांच्या जीवनाशी निगडित आरोग्य व कुटुंब कल्याण खाते आहे. कोरोना काळात मा.मुख्यमंत्री, मा.उप मुख्यमंत्री यांच्या सोबतच भैय्यासाहेबही चर्चेत होते. सर्व परिस्थितीचे गांभिर्य ओळखून त्यांनी तात्काळ उपाय योजना केली व महाराष्ट्राला यातून सहिसलामत बाहेर काढले.यासाठी ना.भैय्यासाहेबांची (WHO)ने जागतिक स्तरावर नोंद घेतली.व त्यांना सन्मानित केले.
असा हा कोरोना योद्धा कोरोना काळात लढतांना व त्यातून महाराष्ट्राला बाहेर काढतांना सगळ्या जगाने पाहिला. याचाच भाग म्हणून त्यांना मराठा सेवा संघामुळे मराठा विश्वभूषण हे नामाभिधान मिळाले. उद्या राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांच्या जयंतीदिनी (१२ जानेवारीला) सिंदखेड राजा येथे या मराठा योद्ध्याला गौरविण्यात येणार आहे.
वेगवेगळ्या मेळाव्याला भैय्यासाहेब उपस्थित राहतात, शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घेतात, त्यावर साधक-बाधक चर्चा करतात. उपाय सांगतात आणि त्या क्षेत्रातील भविष्याचा वेध घेतात. कार्यकर्त्यांच्या शिबिरात नामदार राजेशभैय्या टोपे यांचे मनोगत खूप काही सांगून जाते.
आज शिक्षणाला बाजारू स्वरूप आले असतांना त्याचे पावित्र्य जपणारा, मनाने निर्मळ असणारा, पाण्याचे महत्व ओळखून त्यासाठी योग्य नियोजन करणारा, आशावादी दृष्टिकोन ठेवून अपयशात न खचणारा, यशाने हुरळून न जाता सतत जमिनीवर पाय ठेवणारा, असा हा नेता आहे. संस्कारक्षम वातावरणात वाढलेली, मोठ्या मनाची माणसे नेहमीच मोठी असतात हा अनुभव भैय्या साहेबांकडून अनेकांनी घेतलेला आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत सदैव सैनिका पुढेच जायचे हा मंत्र म्हणत त्यांचा मजल दर-मजल प्रवास सुरूच आहे. या प्रवासात जे सोबत येतील त्यांना बरोबर घेऊन चालत राहणे हा स्वभावधर्म आहे. जे येत नाही त्यांना वगळून भैय्यांनी आपला मार्ग निश्चित केलेला आहे.
१९७४ ला कर्मयोगी अंकुशराव टोपे साहेब यांनी स्थापन केलेल्या मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद समर्थ पणे सांभाळणारे, ग्रामीण भागात उच्च शिक्षणाची गंगोत्री आणणारे, शिक्षण, शेती, सहकार यावर जिवापाड प्रेम करणारे, माननीय नामदार राजेशभैय्या टोपे साहेब हे लोकनेता,लोकसेवक कोरोना योद्धा या पदवीस पात्र आहेत महाराष्ट्राच्या या
लोकनेत्याला, कोरोना योद्ध्याला (महाराष्ट्रातील तमाम जनतेकडून व आमच्या तर्फे) दीर्घायुष्य लाभो. त्यांना वाढदिवसाच्या लाख-लाख शुभेच्छा !
— प्रा.डाॅ.गणेश वि.कंटुले
मत्स्योदरी
कला व विज्ञान महाविद्यालय,
कुंभार पिंपळगाव,
ता. घनसावंगी.
मो. ९८२२८०३५७८
— रामेश्वर लोया
मा.अध्यक्ष, म.ग्रा. रो.ह.यो.,
ता. घनसावंगी, जि. जालना.
मो.९४२१६५५१७९