पारधची एसटी बससेवा बंद; प्रवाशांचे हाल; सेवा सुरू न केल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा

गणेश खिस्ते / भोकरदन
जालना जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आणि बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेलगत असलेले पारध हे गाव जालन्यापासून जवळपास १०० किलोमीटर, तर बुलडाण्यापासून अवघ्या ४० किलोमीटर अंतरावर आहे. पूर्वी येथून जालना आगाराची जालना-पारध बस सकाळी व संध्याकाळी अशा दोन वेळा धावत होती. तसेच गंगापूर आगाराची गंगापूर-छत्रपती संभाजीनगर-पारध, मलकापूर आगाराची मलकापूर-बुलडाणा-पारध-भोकरदन-पुणे आणि जाफराबाद आगाराची जाफराबाद-पारध-वालसावंगी-जळगाव-भुसावळ या मार्गांवर नियमित बसेस सुरू होत्या.
मात्र, संबंधित आगारप्रमुखांच्या मनमानी कारभारामुळे या बसेस टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
खासगी वाहनांकडून आर्थिक लूट
एसटी बसेस बंद झाल्याचा सर्वाधिक फटका महिला प्रवासी, विद्यार्थी, शेतकरी, वयोवृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. नाइलाजास्तव प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून तीनचाकी ऑटो रिक्षा व खासगी वाहनचालकांकडून दुप्पट भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी आहेत. वृत्तपत्रांतून वारंवार हा प्रश्न मांडूनही अधिकारी दखल घेत नसल्याने एसटी अधिकारी आणि खासगी वाहतूक व्यावसायिक यांच्यात लागेबांधे असल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
सिमेंट रस्त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
पारध ते भोकरदन हा सिमेंट रस्ता तयार झाला असून या मार्गावरून उसाचे ट्रक, खासगी मालवाहू ट्रक आणि वाळूचे टिप्पर दररोज धावत आहेत. जड वाहने सुरू असताना एसटी बसेस सुरू करण्यास अडचण काय, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
यासोबतच सिमेंट रस्त्याचे काम शासनाच्या निकषांनुसार झाले का, याची चौकशी करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे. संबंधित ठेकेदार व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
शिक्षण, आरोग्य, व्यापार आणि शासकीय कामांसाठी बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी एसटी महामंडळाच्या विभागीय अधिकाऱ्यांनी तसेच राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी लक्ष घालून बंद बससेवा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.



