UK ची आजची कोरोनाची काय स्थिती जाणून घ्या UKमधून

1,344

Get real time updates directly on you device, subscribe now.

dr murkute newsjalna d 27-09

लेखक

  • गौरव देशमुख
    MS (Advanced Mechanical Engineering)

COVID-१९ म्हणजेच कोरोना विषाणूच्या आघाताने जगभरात आर्थिक, सामाजिक आणि राजकीय वादळ आणलं आहे. १९१८ च्या स्पॅनिश फ्लू नंतर ची हि सर्वात मोठी महामारी मानली जाते. या विषाणूचे मूळ अजून विवादास्पद असलं तरी त्याचा विनाशकारी प्रभाव स्पष्ट आहे. वेगवेगळ्या व्यावसायिक आणि सामाजिक भूमिकेनुसार समाजातल्या प्रत्येक घटकावर त्याचा वेगळा परिणाम झाला. त्यात पर्यटन आणि वाहतूक क्षेत्रावरचा प्रभाव प्रचंड आहे. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून २०१७ मध्ये उच्च शिक्षणासाठी UK मध्ये आलो. MS केल्यानंतर इंग्लंडमधील डर्बी शहरात विमानाचे इंजिन बनवणाऱ्या एका कंपनीत मी काम सुरु केलं. एव्हिएशन म्हणजेच विमानचालनाशी माझा सरळ संबंध असल्यामुळे जागतिक विमान वाहतुकीवरच्या प्रभावावर माझं खास लक्ष आहे. या विषाणूच्या उद्रेकानंतर सुरुवातीच्या टप्प्यातच जवळ जवळ सर्व देशांनी आंतरराष्ट्रीय सीमा बंद केल्या. शिवाय देशांतर्गत विमान सेवेवर त्याचा मोठा परिणाम झाला आणि जगभरात ६०% हुन अधिक प्रवासी विमान सेवा ठप्प झाली, म्हणजेच हि विमानं जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी ग्राउंड करण्यात आली. फक्त कार्गो म्हणजेच मालवाहू विमानं आकाशात राहिली. परिणामी जगभरातल्या सर्व विमान, त्याचे इंजिन आणि इतर भाग बनवणाऱ्या कंपन्या ठप्प झाल्या. यापायी या कंपन्यांना अब्जावधींचं नुकसान झेलावं लागलं. उत्पन्न बंद असताना कंपनी चालवणं अवघड असल्याने मग त्यांनी “हेड काउन्ट रिडक्शन” म्हणजेच शक्य तेवढे इंजिनिअर्स कमी करण्याचा शेवटचा पर्याय निवडला. एअरलाईन्स ने त्यांचे कर्मचारी, एअर होस्टस मोठ्या प्रमाणात कमी केले. हे भयंकर संकट संपायला अजून बराच वेळ असून हे अब्जावधींचे नुकसान भरून काढायला कित्येक वर्षे लागू शकतात.

दीड वर्षांपूर्वी माझं लग्न झालं आणि मग माझी बायको पूजा लोया माझ्यासोबत इथे आली. ती सध्या एका फूड इंडस्ट्री मध्ये काम करते. गेल्या दीड महिन्यापासून मी “वर्क फ्रॉम होम” करतोय. पूजा “सोशल डिस्टंसिन्ग” ची योग्य काळजी घेऊन कामाला जाते कारण तिचं काम घरून शक्य नाही आणि इथल्या फूड इंडस्ट्रीज सध्या युद्धपातळीवर देशातल्या दवाखान्यांना अन्नपुरवठा करण्याचं काम करत आहेत. भारताच्या मानाने इथे लॉकडाउन तसा शिथिल आहे. अर्थातच अत्यावश्यक गरजांची दुकानं सोडून बाकी सगळे व्यवसाय आणि कार्यालयं पूर्ण बंद आहेत, पण “सोशल डिस्टंसिन्ग” ची काजी घेऊन तुम्ही आवश्यक कामांसाठी बाहेर निघू शकता. विरळक लोकसंख्या आणि लोकांमधील सामाजिक जाणीव यामुळे इथे सोशल डिस्टंसिन्ग प्रभावी आहे. लोक दुकानाबाहेर स्वतः विशिष्ट अंतर ठेवून रांगेत उभे राहतात.

जगाच्या दूरच्या टोकावर राहूनही आम्हाला मायभूमीचा विसर नाही. इथल्या बातम्यांपेक्षा भारतातल्या घडामोडी, सरकारी योजना आणि त्यांची अंमलबजावणी यावर आमचं जास्त लक्ष असतं. सरकारसमोर विषाणूचा प्रसार, लॉकडाउनची अंमलबजावणी, परिणामी बेरोजगारी आणि कोसळणारी अर्थव्यवस्था असे चौफेर आव्हान आहे आणि त्यासमोर जगातल्या प्रभावी यंत्रणाही कोलमडताना आम्ही पहिल्या. भारतातील गरीब कामगार यात भरडून निघाले आणि त्यांची अवहेलना मनात घाव घालून गेली. त्यात महाराष्ट्रावर या विषाणूचा जास्त प्रभाव असल्याने आम्हाला कुटुंबाची काळजीही लागून आहे. राज्य सरकारने यावर खंबीर योजना आखून विविध स्तरांवर या विषाणूशी दोन हात केलेले आम्ही पाहिले. पालकमंत्री राजेश टोपेंची आमच्या लग्नात भेट झालेली. त्यांनीही विदेशातून उच्च शिक्षण केलेलं त्यांच्या बोलण्यात आणि व्यक्तिमत्त्वात दिसतंच, त्यांच्या सध्याच्या कामातून त्याची प्रचितीही आली. जालना जिल्ह्यातील कुंभार पिंपळगाव हे माझं आणि पूजाचं गाव. गावातील शेतकरी आणि कामगारांवरही या परिस्थीचा तीव्र परिणाम झाला असून पूजाचे वडील रामेश्वरजी लोया गावातील गरिबांना मदत करण्यात अग्रेसर आहेत. संकटकाळी सामाजिक भूमिका निभावणाऱ्या अशा व्यक्तींचा आम्हाला अभिमान आहे, शिवाय आम्ही स्वतः त्या मोहिमेत भाग घेण्याची आमची इच्छाही आहे.

मानसिक स्तरावर या परिस्थितीशी झुंज देण्यासाठी माझा “पॉसिटीव्ह अप्रोच” चा फॉर्मुला (आणि उपदेश) आहे. होय जनजीवन विस्कळीत झालंय, पण आता कुटुंबासोबत जास्त वेळ घालवण्याची संधी (सक्तीने का होईना) आपल्याला मिळाली आहे. सोबत राहा, संवाद घडवा, नाते बळकट करा! होय घरी बसून राहावं लागतंय, पण आता आवडती पुस्तकं वाचायची, नवीन गोष्टी शिकायची, घरगुती छंद जोपासायची संधी मिळाली आहे. इंटरनेटवर जगभराचं ज्ञान आहे, त्याचा वापर केल्यास अविश्वसनीय फायदे होऊ शकतात, ती संधी आता मिळाली आहे. पूजाचा या उन्हाळ्यात युरोपला जाण्याचा हट्ट होता, पण आता तिने फावल्या वेळात एक-एक पुस्तक वाचून संपवायचा सपाटा लावला आहे. मला भारताच्या अंतराळ मोहिमांचा आणि भारतीय हवाई दलाच्या विमानांचा अभ्यास करायचा होता, ते आता शक्य होतंय. ISRO च्या जगाला लाजवणाऱ्या ऐतिहासिक मोहिमांचा मला अभिमान आहे. मी माझी गिटार वाजवणं पुन्हा सुरु केलंय, ज्यासाठी मी पूर्वी “वेळ मिळत नाही” म्हणून रडत होतो. होय हॉटेल्स, मॉल बंद झालेत, पण आता आम्ही घरीच वेगवेगळे चविष्ट पदार्थ बनवतो. मलाही कुकिंगचा छंद आहेच, त्यात YouTube जिंदाबाद! माझे भावंडं जगभरात पसरलेले आहेत, पूर्वी कामापायी त्यांच्याशी संपर्क ठेवणं अवघड झालं होतं. आता रोज भारत-स्वित्झर्लंड-इंग्लंड-अमेरिका स्तरीय विडिओ कॉल्स चालू असतात. एकंदरीत लॉकडाउनच पुरेपूर फायदा आम्ही घेत आहोत!

थेट uk तुन

  • गौरव देशमुख
    MS (Advanced Mechanical Engineering)

Get real time updates directly on you device, subscribe now.

20% CASHBACK OFFER new 20% CASHBACK OFFER new