लातुर जिल्हा

कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लातूर महापालिकेने “धारावी मॉडेल” राबवण्यासाठी प्रयत्न करावेत-पालकमंत्री अमित देशमुख

बबनराव वाघ,उपसंपादक

न्युज लातूर, दि.29:- लातूर शहरात दिवसेंदिवस covid-19 चा प्रादुर्भाव वाढतच चाललेला आहे. त्याअनुषंगाने लातूर महापालिकेने हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी “धारावी मॉडेल” कशा पद्धतीने येथे राबवता येईल यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले.


शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात आयोजित लातूर महापालिका क्षेत्रात covid-19 चा प्रादुर्भाव बाबत च्या उपाययोजना आढावा बैठकीत पालकमंत्री देशमुख बोलत होते. यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, महापालिका आयुक्त देविदास टेकाळे, महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती दीपक मठपती, महापालिकेचे विरोधी पक्षनेते दीपक सूळ, परिवहन सभापती मंगेश बिराजदार, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन डोईबोले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे, डॉ. गिरीश ठाकूर, महापालिकेचे सहायक आयुक्त वसुधा फड, सुंदर बोंदर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले की, धारावी मध्ये कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या त्या उपाययोजनांची लातूर महापालिका क्षेत्रात अंमलबजावणी करण्याबाबत महापालिकेने प्रयत्न करावेत व येथील covid-19 चा प्रादुर्भाव कमी करावा. याकरिता हॉटस्पॉट ठरत असलेल्या भागातील सर्व लोकांची एकाच दिवशी टेस्ट करणे तसेच त्या लोकांना एखाद्या ठिकाणी शिफ्ट करून चौदा दिवस कोरंटाईन करणे उपाय योजना राबविण्याबाबत चाचपणी करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
तसेच लातूर महापालिकेने सर्व 18 प्रभागांमध्ये एक स्वाब कलेक्शन सेंटर निर्माण करावे व त्या ठिकाणी आवश्यक आरोग्य कर्मचारी नेमून त्या प्रभागातील लोकांचे स्वाब घेण्याची व्यवस्था करावी. त्याप्रमाणेच महापालिकेने चेस दी वायरस या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर मास टेस्टिंग करावी. महापालिकेने प्रभाग निहाय टास्क फोर्सची निर्मिती करावी व या प्रभागाची जबाबदारीसाठी अधिकाऱ्यांच्या टीम तयार कराव्यात. या प्रभागात कोविडचा उपाययोजना राबवण्यासाठी स्थानिक नगरसेवकांची मदत घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले.


लातूर शहरात कोविडचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे हे लक्षात घेऊन लातूर महापालिकेने किमान 1000 बेडची उपलब्धता करून ठेवावी. तसेच लातूर शहरातील सर्व खाजगी रुग्णालयातील बेड ना ऑक्सिजनचा पुरवठा उपलब्ध करण्याबाबतची कार्यवाही करून घ्यावी. महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिका व्यतिरिक्त अधिकच्या सहा रुग्णवाहिकांची तयारी ठेवावी व शहरातील कंटेंटमेन झोनसाठी खाजगी सुरक्षा रक्षक उपलब्ध करण्याबाबत प्रयत्न करावेत अशा सूचना पालकमंत्री देशमुख यांनी दिल्या.


लातूर शहरातील स्त्री रुग्णालय हे पूर्णपणे कोविड केअर सेंटर करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक, अधिष्ठता व महापौर यांनी संयुक्तपणे पाहणी करावी. तसेच शहरातील खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील किमान 100 बेडस कोरोना रुग्णासाठी राखीव ठेवण्याबाबतची कार्यवाही प्रशासनाने तात्काळ करावी. त्याप्रमाणेच लातूर शहरात बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी त्यांना स्वतःहून कोरोना टेस्ट करावयाची असेल तर ही सुविधा एखाद्या पेट्रोल पंप या ठिकाणी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले.
लातूर महापालिकेला मोठ्या प्रमाणावर रॅपिड टेस्ट करण्यासाठी रॅपिड किट्स उपलब्ध करून दिले जातील तसेच महापालिकेने कोविड केअर सेंटरसाठी एखादे मोठे मंगल कार्यालयची पाहणी करावी. त्याप्रमाणेच जिल्हा शल्यचिकित्सक यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी हॉस्पिटल मधील बेडची उपलब्धतेबाबत डॅशबोर्ड नियमितपणे अपडेट करत जावा, असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले. तसेच सर्व शासकीय रुग्णालये, सर्व कोविड केअर सेंटर व लातूर शहरात स्वच्छता व साफसफाई चांगली ठेवण्याबाबतची कार्यवाही करावी असेही त्यांनी निर्देशित केले.


यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी लातूर महापालिकेच्या हद्दीतील कन्टेन्ट झोन ची माहिती दिली तसेच प्रशासनाच्या वतीने लातूर महापालिकेला किमान एक लाख रॅपिड टेस्ट किट उपलब्ध करून द्यावेत अशीही मागणी त्यांनी केली. प्रारंभी महापालिका आयुक्त देविदास टेकाळे यांनी महापालिका प्रशासनामार्फत लातूर शहरात राबविण्यात येत असलेल्या कोरोना उपाययोजनांची माहिती दिली व पुढील काळात प्रशासनाच्या तयारी विषयी ही त्यांनी सांगितले.

खालील प्रमाणे निर्देश राबवावे

महापालिकेने मोठ्या प्रमाणावर मास टेस्टिंगची मोहिम राबवावी

महापालिकेने प्रत्येक प्रभागात एक स्वाब कलेक्शन सेंटर निर्माण करावे

covid-19 रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन किमान 1000 बेडची उपलब्धता ठेवावी

लातूर शहरातील सर्व खाजगी रुग्णालयातील उपलब्ध असलेल्या बेड्स ना ऑक्सिजन पुरवठा असला पाहिजे

महापालिकेने अतिरिक्त सहा रुग्णवाहिका तयार ठेवाव्यात

सर्व रुग्णालये, कोविड सेंटर व संपूर्ण लातूर शहरात स्वच्छता व साफसफाई चांगली ठेवावी

खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील किमान 100 बेड कोविड रुग्णासाठी आरक्षित करावेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक