जालना जिल्हा

कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कठोर कारवाईसाठी तयार रहावे -जिल्हाधिकारी बिनवडे

न्यूज जालना ब्युरो दि. 1 :– कोरोना या महामारीच्या काळामध्ये प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांना जबाबदाऱ्या नेमुन दिल्या आहेत. दिलेल्या जबाबदाऱ्या समजुन घेत मर्यादित काम न करता नाविन्यपुर्ण संकल्पना व कल्पकतेने काम करावे. काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी प्रशासन खंबीरपणे उभे असुन काम न करणाऱ्या कुठल्याही अधिकाऱ्याची गय केली जाणार नसल्याचे स्पष्ट करत कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कठोर कारवाईसाठी तयार रहावे, असा सज्जड ईशारा जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिला.


कोरोनाच्या अनुषंगाने आज दि. 1 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बिनवडे बोलत होते.


यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) दीपाली मोतियाळे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीमती शर्मिला भोसले, उपजिल्हाधिकारी अंजली कानडे, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रिना बसेय्ये, जिल्हा नियोजन अधिकारी अधिकारी वैभव कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कडले, तहसिलदार श्रीकांत भुजबळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री चांडक, उप अभियंता श्री नागरे आदींची उपस्थिती होती.


जिल्हाधिकारी बिनवडे म्हणाले, जालना जिल्ह्यामध्ये हायरिस्क व लोरिस्क सहवासितांचे अलगीकरण करण्यासाठी कोव्हीड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहेत. या सेंटरच्या माध्यमातुन नागरिकांना देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जा उत्कृष्ट ठेवण्याबरोबरच दैनंदिन स्वच्छता ही झालीच पाहिजे. या कामामध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड स्वीकारली जाणार नाही. या संदर्भात नागरिकांची एकही तक्रार येणार नाही, याची सर्व संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील प्रत्येक कोव्हीड सेंटरला त्या त्या उपविभागातील उप विभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी यांनी दैनंदिन भेट देऊन त्या ठिकाणी नागरिकांना देण्यात येत असलेल्या सुविधांची पहाणी करावी. नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास त्यांचे जागेवरच निरसन करावे. या कामात कुठेही हयगय अथवा दिरंगाई आढळल्यास संबंधित नोडल अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन त्यांच्या कठोर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी बिनवडे यांनी यावेळी दिला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक