देशविदेश

वाढोणा येथील गरीब कुटुंबातील शीतल शेळके हिने मिळवले दहावीत ९४ टक्के गुण


शास्त्री विद्यालयाच्या ‘शीतल’ ची यशोगाथा
न्यूज परतूर – घरची परिस्थिती जेमतेम…कुठलीही शिकवणी नाही की खासगी क्लास नाही…शाळेतील नियमित उपस्थिती,घरीच स्वत:हून केलेला अभ्यास,अंगी असलेली यश मिळविण्याची जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या शीतल ज्ञानेश्वर शेळके या गरीब आणि होतकरू विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत चक्क 94 टक्के गुण मिळविले आहेत.

शहरासह संपूर्ण तालुक्यात आता शीतलचे कौतुक होत आहे.मन लाऊन अभ्यास केला तर कुठलीही शिकवणी किंवा क्लास शिवाय चांगले यश मिळविता येते हेच शितलने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

शीतल ज्ञानेश्वर शेळके…शहरातील लालबहादूर शास्त्री विद्यालयाची विद्यार्थिनी…वाटूरजवळील वाढोणा हे शीतलचे गाव…तिचे पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण गावातीलच प्राथमिक शाळेत झाले…पुढील शिक्षण घेण्यासाठी तिने परतूरच्या लालबहादूर शास्त्री विद्यालयात प्रवेश घेतला.शितलच्या घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे.वडील रिक्षा चालवतात तर आई शेतात मोलमजुरी करते.हलाखीच्या स्थितीमुळे आई-वडील शीतलच्या शिक्षणासाठी परतूरला भाड्याची खोली करून राहणे तर दूरच परंतु शितलच्या शिक्षणावर देखील जास्त खर्च करू शकत नव्हते.शासनाच्या मोफत प्रवास योजनेच्या माध्यमातून ती दररोज बसने शाळेत यायची.येण्या-जाण्यात बराचसा वेळ जायचा.अशा बिकट परीस्थितीतही शीतल डगमगली नाही.तिने संपूर्ण लक्ष अभ्यासवर केंद्रीत केले.सर्व विषय चांगल्या पद्धतीने समजाऊन घेतले.अभ्यासात जाणवणार्‍या शंकांचे शिक्षकांकडून वेळीच निरसन केले.शाळेतील नियमित उपस्थिती,दिलेला अभ्यास वेळीच करणे,व कुठल्याही परिस्थितीत दहावीत चांगल्या गुणांनी यशस्वी व्हायचेच असा मनाशी केलेला ठाम निश्चय यामुळे तिने मार्च 2020 मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत चक्क 94 टक्के गुण मिळविले.तिच्या या यशाबद्दल शहरासह तालुक्यात कौतुक होत आहे.

अभ्यासात जाणवणार्‍या शंका वेळीच समजाऊन घेतल्या.मुख्याध्यापक खिल्लारे,उप मुख्याध्यापक शेषराव वायाळ ,वर्गशिक्षक पाटील ,तनपुरे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षकांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.मनाशी ठाम निश्चय केला तर कुठल्याही परिस्थितीत यश मिळविता येते हे मात्र निश्चित. – शीतल शेळके,विद्यार्थिनी,ला.ब.शा.विद्यालय,परतूर.

शीतल शेळके ही आमच्या शाळेची गरीब आणि होतकरू विद्यार्थिनी आहे.सहावीत असताना ती आमच्या शाळेत आली.अभ्यासात हुशार आहे.आज्ञाधारक आहे.दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करते.नववीची परीक्षा झाल्यानंतर आम्ही शाळेतच दहावीचे मोफत क्लास सुरू करतो.याचा विद्यार्थ्यांना खूप उपयोग होतो.वर्षभर कुठल्याही क्लासविना शीतलने मिळविलेले यश खरोखरच अभिनंदनीय आहे.  दत्तात्रय खिल्लारे,मुख्याध्यापक,ला.ब.शा.विद्यालय,परतूर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक