जालना जिल्हा

जालना जिल्ह्यात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने ४४ काेटी पेक्षा अधिक कर्जधारकांना दिला लाभ

  धर्मराज आंधळे/न्यूज जालना राज्यात लाखोंच्या संख्येने निघालेल्या मराठा क्रांती मोर्चानंतर मराठा युवकांना स्वयंरोजगाराची दालने खुली करून देण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने राबविलेल्या योजनेच्या माध्यमातुन जालना जिल्ह्यातील ८२७ मराठा तरुणांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. महामंडळाअंतर्गत बँकांनी ४४ काेटी पेक्षा जास्त रुपयांचे कर्ज वाटप करुन युवकांना लाभ मिळाला आहे. सरकारी योजना म्हटली की, कर्जखाती ना उत्पादक मालमत्ता (एनपीए) मध्ये जाण्याचे प्रमाण अधिक असते. परंतु, या महामंडळाचे आजतागायत एकाही लाभार्थ्यांचे कर्ज खाते ‘एनपीए’मध्ये गेलेले नाही. मुद्रा योजनेतील थकलेल्या कर्जामुळे बँका शासकीय योजनेतील कर्जवाटपात हात आखडता घेत असताना राज्यातील विशेषत: सहकारी बँका महामंडळाच्या योजनेला सकारात्मकपणे पुढे नेण्यास तयार असल्याचे महामंडळाने म्हटले आहे. आरक्षणासह विविध मागण्यांसाठी काही वर्षांपूर्वी मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यभरात निघालेल्या मोर्चानी वातावरण ढवळून निघाले होते. आरक्षण देण्याआधी मोर्चेकऱ्यांच्या काही मागण्या तत्कालीन भाजप-सेना सरकारने मान्य केल्या होत्या. मराठा युवकांना स्वयंरोजगाराचे दालन खुले करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे सक्षमीकरण ही त्यापैकीच एक मागणी. त्या अनुषंगाने महामंडळाने नवीन योजना मांडली. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा, गट कर्ज व्याज परतावा, गट प्रकल्प कर्ज योजना याद्वारे स्वयंरोजगारासाठी आर्थिक साहाय्य करण्याचे धोरण स्वीकारले गेले. त्या अंतर्गत वेगवेगळ्या योजनेंतर्गत विशिष्ट मयादेपर्यंतच्या रकमेचे १२ टक्के दराने (वार्षिक) व्याज महामंडळ बँकांना देते. यासाठी लाभार्थ्यांने मुद्दल रक्कम नियमितपणे भरणे बंधनकारक आहे. या योजनांची अंमलबजावणी होऊन वर्षभराचा कालावधी झाला आहे. त्याचा आढावा घेतल्यास महामंडळाचे मागील १५ वर्षांतील काम आणि मागील दीड-दोन वर्षांतील काम यातील फरक लक्षात येईल. मराठा समाजातील जास्तीत जास्त तरुण युवकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहान अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक दिनेश उढाण यांनी केले आहे ..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक