अहमदनगर जिल्हाधार्मिक

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे ‘बाबाभाई’ ने केले दोन हिंदू मुलींचे कन्यादान

अहमदनगर न्यूज दि २३ : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील एका गरीब कुटुंबातील प्रतिकूल परिस्थितीत वाढलेल्या मुलींच्या लग्नप्रसंगी मुस्लिम समाजातील एका युवकाने ( बाबाभाई ) मामाची भूमिका निभावत कन्यादानाचे पवित्र कार्य पार पाडले . या मुलींची सासरी पाठवण करताना त्यांचे डोळे डबडबले होते . जाती – धर्मापलीकडे जाऊन माणुसकीच्या नात्याने पार पाडलेले हे कार्य परिसरात सामाजिक सलोख्याचे दर्शन घडविणारे ठरले आहे . बोधेगाव ( ता . शेवगाव ) येथील सविता आंबादास तट्टू या महिलेने गावातच धुणीभांडी करून आपल्या दोन मुलींना लहानचे मोठे केले . सविता यांना सख्खा भाऊ नसल्याने येथील बन्नोमाँ हॉटेल व्यवसायिक बाबाभाई पठाण यांनी भाऊ म्हणून त्यांना वेळोवेळी मदत केली . मागील आठवड्यात सविता तट्ट यांच्या गौरी व सावरी या दोन मुलींचे लग्न जमले . रिती रेवाजाप्रमाणे लग्नप्रसंगी दोन्ही मुलींच्या पाठीशी मामाची गरज भासली . तेव्हा जाती – धर्माची मर्यादा बाजूला सारून जुनून ए इन्सानिएतचे अध्यक्ष असलेले बाबाभाई पठाण खंबीरपणे मुलींच्या पाठीशी मामाचे कर्तव्य निभावण्यासाठी उभे राहिले . लग्नासाठी लागणारी आवश्यक मदत पुरवून त्यांनी कन्यादानाची महत्वाची जबाबदारी पार पाडली . लहानचे मोठे डोळ्यांसमोर झालेल्या या दोन्ही मुलींना सासरी पाठवण करताना उपस्थितांसह बाबाभाईंचे डोळे डबडबले होते .रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकीचे नाते महत्वाचे असते हे बाबाभाई यांनी कृतीतून दाखवून दिले लग्नासाठी येथीलच मुलींची मावशी असलेल्या संगिता भुसारी यांनीही मोठे आर्थिक सहकार्य केले . बाबाभाई यांनी कोरोनाच्या संकटातही लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून गावातील गोरगरिबांना किराणा , भाजीपाला आदी मदत पोहचविली . शहरातून शेकडो किलोमीटर पायी चालून ग्रामस्थांना वाटसरूंना पिण्याचे पाणी , फळे व जेवण देत माणुसकी जपली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक