जालना जिल्हा

जालना जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे मूग व कापसाच्या नुकसानीचे पंचनाम्याचे पालकमत्र्यांचे आदेश

न्यूज जालना ब्युरो दि २४ जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मूग व कापूस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विविध विषयावर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री टोपे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी  निवृत्ती गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे,जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नानासाहेब चव्हाण, कल्याण सपाटे, महादेव घेंबड, विष्णुपंत गायकवाड, सतीश होंडे आदींची उपस्थिती होती.

  पुढे बोलताना टोपे म्हणाले, जिल्ह्यात गत काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या पावसामुळे मूग पिकाबरोबरच कापूस पिकामध्ये पाणी साठल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांना या नुकसानीची रक्कम मिळावी यासाठी नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देत यासंदर्भात मदत व पुनर्वसन मंत्री तसेच सचिवांशी शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरपाईची रक्कम तातडीने देण्यासंदर्भात चर्चासुद्धा करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. तसेच ज्या शेतकऱ्यांनी मूग व कापूस या पिकांचा विमा भरला होता. त्या शेतकऱ्यांना  विम्याची रक्कमही तातडीने मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाठपुरावा करण्याचे निर्देशही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी दिले.

जालना जिल्ह्यामध्ये ऊसावर पडलेल्या पांढरी माशी तसेच मावा या रोगामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांनाही या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी त्याचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत. त्याचबरोबर नुकसानभरपाईसाठी पाठपुरावा करण्याचे निर्देशही पालकमंत्री टोपे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक