जालना जिल्हा

जालन्यातील विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

न्यूज जालना (ब्युरो)दि २८- चारित्र्यावर संशय घेऊन सासरचे लोक नेहमी शारीरिक व मानसिक छळ करीत असल्याने जाळून घेतलेल्या जालना शहरातील संभाजीनगर भागातील आशा आशिष मित्तल (वय ३५) या विवाहित महिलेचा औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. याप्रकरणी तिच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या पतीसह चौघाजणांविरुद्ध सदर बाजार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मयत आशा मित्तल यांची आई नंदाबाई सुभाष अग्रवाल (रा. दिंडोरी, जि. नाशिक) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांची मुलगी आशा यांचे २००८ मध्ये जालना येथील आशिष नरेश मित्तल याच्यासोबत लग्न झाले होते. लग्नानंतर त्यांना दोन मुले झाले आहेत. सन २०११ पासून आशा मित्तल यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन पती आशिष मित्तल, सासू, सासरे नरेश मित्तल आणि चुलत सासरे श्याम मित्तल हे नेहमी शारीरिक व मानसिक त्रास देत होते.

याबाबत वारंवार आशा या आपल्या आईला फोन करून माहिती देत होत्या. दरम्यान, ९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आशा मित्तल यांनी सासरच्या लोकांच्या छळास कंटाळून अंगावर सॅनिटायझर्स ओतून घेऊन जाळून घेतले होते. यामध्ये ८० ते ९० टक्के भाजलेल्या आशा यांना औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

तब्बल १८ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्यांचे काल सकाळी निधन झाले आहे.
याप्रकरणी नंदाबाई अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून पती आशिष मित्तल, सासू, सासरे नरेश मित्तल आणि चुलत सासरे श्याम मित्तल (सर्व रा. संभाजीनगर जालना) यांच्याविरुद्ध सदर बाजार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश झलवार करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक