अंबड तालुका

पत्रकारीतेचा प्रवाह बदलला असला तरी मुल्य मात्र तीच- प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे

न्यूज जालना (ब्युरो )दि २८


डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वृत्त विद्या आणि जनसंवाद विभागाच्या विद्यार्थ्यांशी संवाद

प्रसारमाध्यमात अलीकडे डिजीटलचे युग आल्यामुळे पत्रकारीतेचा प्रवाह बदलला असला तरी सत्य बातमी सांगण्याचे मुल्य कायम असल्याने सर्वसामान्यांचा विश्‍वास आहे. जागतिकीकरणानंतर वृत्तपत्र व्यवसायातही मोठ्या प्रमाणात बदल झाल्यामुळे आता वृत्तपत्रांनी जाहिरातीच्या मदतीने चालवलेली अर्थनिती बदलून विक्री किंमतीवरच वृत्तपत्र चालवण्याचे नियोजन केले तरच या क्षेत्राला आर्थिक स्थैर्य येईल असे मत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी व्यक्त केले.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वृत्त विद्या आणि जनसंवाद विभागाच्या वतीने विभाग प्रमुख डॉ.दिनकर माने यांच्या मार्गदर्शनाखाली करोना काळात ऑनलाईन संवाद मालिका चालवली जाते. गुरुवारी सायंकाळी या संवादात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी विद्यार्थ्यांना पत्रकारीतेचे बदलते प्रवाह या विषयावर मत व्यक्त केले

यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना त्यांनी उत्तरे देऊन या क्षेत्रातील वास्तवच मांडले. करोना काळात संपूर्ण देशात टाळेबंदी लावण्यात आल्याने घरोघरी जाणारी वर्तमानपत्रे आता पीडीएफ च्या माध्यमातून डिजीटल झाली. माध्यमाचा प्रवाह बदलला असला तरी पत्रकारीतेची सत्य बातमी सांगण्याचे मुल्य कायम असल्याने लोकांचा विश्‍वास आजही वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातमीवरच आहे. बदलत्या प्रवाहात प्रिंट वृत्तपत्रे आणि पत्रकारांचे महत्व आणि त्यासमोरील आव्हाने याबाबतही वसंत मुंडे यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तरे देताना या क्षेत्रातील आर्थिक वास्तव उलगडले. जागतिकीकरणानंतर वृत्तपत्र क्षेत्रात डिजीटल क्रांती आली. करोनामुळे तर प्रिंट मिडीयामध्ये मोठा बदल झाला आहे. आठ पानी वृत्तपत्र तयार करण्यासाठी दहा रुपये खर्च येत असताना ते केवळ दोन-तीन रुपयात घरपोहच दिले जाते. उत्पादन आणि विक्रीमधील तुट जाहिरातदारांच्या मदतीने भरुन काढण्याची अर्थनिती आता बदलावी लागेल. विक्री किंमत वाढवुनच वृत्तपत्राचे व्यवस्थापन चालवले तरच या क्षेत्रामध्ये आर्थिक स्थैर्य येऊ शकते

सध्या करोनामुळे जाहिराती बंद झाल्याने मोठ्या वृत्तपत्रांनीही आवृत्त्या बंद करुन संपादकांपासून वार्ताहरापर्यंत अनेकांना कामावरुन काढले आहे. त्यामुळे या क्षेत्रात आहे ते लोकांच्याही हाताला काम मिळत नसल्याने नवीन लोक या क्षेत्रात कसे येतील? आणि त्यांना भवितव्य काय? याचा विचार करुन वृत्तपत्रांनी अर्थनिती बदलली पाहिजे. स्वातंत्र्यपूर्व काळातील पत्रकारीता ही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ध्येयाने प्रेरित होती. नंतरच्या काळात समाजाला जागृत करण्यासाठी मोठे योगदान दिले. व्यवस्थेच्या विरोधात जाऊन लढण्याची हिंमत ज्यांच्यामध्ये आहे तेच पत्रकार होऊ शकतात.

मात्र आता तंत्रज्ञानामुळे पत्रकारीतेचे स्वरुप बदलले असले तरी सत्य सांगण्याचे मुल्य मात्र कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संवादात वृत्तविद्या आणि जनसंवाद विभागातील विद्यार्थी वैभव जाधव, प्रतिक्षा पगारे, मानसी शिंदे, आकांक्षा पुरी, सिध्दी घायाळ, सुनंदा माने, ओम पुरी, आकाश सावंत यांनी प्रश्‍न विचारले. संवादाचे सुत्रसंचलन अतिश शेजवळ आणि आभार कोमल पौळ यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक