Breaking News
बदनापूर तालुकाशेतीविषयक

बदनापूर तालुक्यातील भोरडी नदी सदा होती कोरडी ‘नाम’ मुळे वाहू लागली दुथडी..!

  किशोर सिरसाठ/बदनापूर दि ३१ बदनापूर : गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणाचे संतुलन या ना त्या कारणांनी ढासळत चाललेले आहे. वातावरणांतील बदल आता अनिश्चित झालेले आहे. त्यामुळे लहरी हवामानाचा फटका हा प्रामुख्याने शेतीक्षेत्रालाच बसलेला आहे. कधी दुष्काळ, नापिकी, कधी अतिवृष्टी, तर कधी वादळी वारे अशा अनेक नैसर्गिक संकटांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. तथापि, निसर्गाच्या लहरीपणामुळे 2012, 2014, 2016 या तीनही वर्षी जालना जिल्ह्यामध्ये प्रचंड दुष्काळ पडला होता. परिणामी पाण्याचे दुर्भिक्ष ही मोठी समस्या सर्वांपुढे उभी राहिली होती. अशातच ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘नाम फाऊंडेशन’ च्या माध्यसमातून अनेक गावशिवारात जलक्रांती घडविण्यात आली. जालना जिल्ह्यातील भराडखेडा ( ता. बदनापूर ) शिवारातही युवा सेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी पुढाकार घेऊन ‘नाम फाऊंडेशन’ आणि लोकसहभागाच्या माध्यमातून जलक्रांती घडवून आणली.आज हा संपूर्ण परिसर पाणीदार झाला असून या भागातील शेतकरी सुजलाम सुफलाम बनले आहेत. पाण्याच्या दुर्भिक्षाची तीन वर्षे ! भराडखेडा ( ता.बदनापूर ) लगतच्या गावांची जीवनवाहिनी म्हणून भोरडी नदीकडे बघितले जायचे. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे 2012, 2014, 2016 या तीनही वर्षी जालना जिल्ह्यामध्ये प्रचंड दुष्काळ पडला होता. पाच वर्षांमध्ये भोरडी नदीला एक थेंबही पाणी आले नव्हते. भराडखेड्यासह उजैनपुरी, आन्वी, राळा,केळीगव्हाण या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या आन्वी व राजेवाडी धरणात पक्षांना पिण्यासाठी सुद्धा पाणी शिल्लक राहिले नव्हते. गावामध्ये दोन ते तीन दिवसाआड टॅकरने पाणी पुरवठा केला जात होता. यामुळे ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागायचा. पिके व फळबागा डोळ्यादेखत पाण्याअभावी वाळून चालली होती. काही शेतकर्‍यांनी त्यावर कुर्‍हाड चालविली होती. मोठ्या प्रमाणावर मोसंबी, डाळींब, सिताफळ आदी फळबागा होत्या. जवळपास 500 एकर डाळींब व 500 एकर मोसंबी दुष्काळामुळे नष्ट झाली. यामुळे पाण्यासाठी वनवन भटंकती करावी लागायची. पक्षांना, गुरा-ढोरांना पिण्यासाठी पाणी शिल्लक राहिले नव्हते.
टीव्हीवरची मुलाखत ठरली ‘संजीवनी’! ज्यांच्या पुढाकारातून भराडखेडा परिसरात ही जलक्रांती घडून आली; त्या युवासेनेच्या जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी सांगितले की, 2016-17 च्या दरम्यान मी एक दिवस टिव्ही चॅनेलवर सुप्रिद्ध सिनेअभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांची मुलाखत ऐकली. त्यांच्या ‘नाम फाऊंडेशन’ च्या माध्यमातून दुष्काळी परिसरामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांना आधार देण्यासाठी नदी नाल्याचे खोलीकरण व रूंदीकरण करण्याचे काम महाराष्ट्रामध्ये हाती घेतल्याचे समजले. त्यावेळी मला विश्‍वास वाटला की, आपण ही ‘नाम फांऊडेशन’ला संपर्क करून त्यांच्या व गावकर्‍यांच्या माध्यमातून आपल्या भोरडी नदीचे पुर्नजीवन करू शकतो. हा निश्‍चय मनाशी बाळगून गावकर्‍यांसोबत बैठक घेऊन लोकवाट्याची तयारी दाखविली. ‘नाम’चे राज्य समन्वयक केशव आघाव व मराठवाडा समन्वयक राजाभाऊ शेळके यांना संपर्क करून सर्व परिस्थिती समजावून सांगितली. दुष्काळामुळे सर्व पिके व फळबागा शेतकर्‍यांना तोडण्यास सुरूवात केली. प्रचंड असे नुकसान झालेले आहे. शेतकर्‍यांचे उत्पन्न घटले आहे.अशा बिकट परिस्थितीत ‘नाम फाऊंडेशन’च आमचा आधार होऊ शकते. ‘नाम’ने सहकार्य केले तरच शेतकरी उभा राहु शकतो. नसता, शेतकर्‍यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही,असे आघाव व शेळके यांना सांगितले. त्यांनी सर्व परिस्थिती समजावून घेवून ‘नाम’ फाऊंडेशनकडून मदत मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले. खरं म्हणजे ही मुलाखतच आमच्या परिसराला नवसंजीवनी देणारी ठरली, असे श्री. घुगे यांनी जालन्याचे अग्रगण्य डिजिटल असेलेले न्यूज जालना लाइव्ह’ शी बोलताना सांगितले.
नाम फाउंडेशनच्या माध्यमातून कामाला सुरुवात आठवडा भरानंतर लगेच ‘नाम’ कडून दोन पोकलॅन मशनरीद्वारे भराडखेडा येथे भोरडी नदीमध्ये खोलीकरण व रूंदीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. गावातील नदी लगतच्या शेतकर्‍यांनी एक विहीर, एक ड्राम डिझल दिले. तसेच भाऊसाहेब घुगे यांनी त्यांचे वडील भराडखेड्याचे माजी सरपंच कै.एकनाथराव घुगे (अण्णा) यांच्या स्मृतीपित्यर्थ एक लक्ष रूपयांचा लोकवाटा दिला. या प्रमाणे कामास सुरूवात होऊन जवळपास दोन महिन्यामध्ये भोरडी नदीचे चार किलोमीटर व गध्याचा नाला, वारकीचा नाला व परिसरातील स्थानिक नाल्याचे जवळपास 6 ते 7 किलोमीटर खोलीकरण व रूंदीकरणाचे काम पुर्ण झाले. यासाठी गावातील रामेश्‍वर दराडे, विलास तुपे, कैलास पालवे, ज्ञानेश्‍वर जावळे, रामदास नाना बारगाजे प्रल्हाद टकले, बाबासाहेब दराडे, अण्णा दराडे, संतोष मुळक, बाजीराव शिंदे, भगवान बारगाजे, वाल्मीक दराडे, भानुदासराव घुगे, सखाराम जावळे, ज्ञानदेव मदन, देवकर्ण मदन यांच्यासह ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. काही शेतकर्‍यांनी ट्रॅक्टरद्वारे नदीमधील मुरूम नेवून शेतरस्ते तयार करून घेतले. खोलीकरणातून निघालेल्या मुरूमामध्ये नदीच्या दोन्ही तिरावरील कायम स्वरूपी शेत रस्त्याचा प्रश्‍न मिटला. त्यांना शेतात जाण्यासाठी रस्ते तयार झाले. जवळपास 5 किलोमीटरचे रस्ते तयार झाले. भराडखेडा शिवारात 2016 च्या दुष्काळात ‘नाम’ फाऊंडेशन व लोकसहभागातून करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामातून जलक्रांती घडून आली.
लोकसहभागातून व ‘नाम फाउंडेशन’ मुळे जलक्रांती आणि हरितक्रांतीही! यावर्षी झालेल्या दमदारपावसामुळे नदी व नाला खोलीकरणाच्या कामात तुडुंब पाणी साचले असून कोरड्या पडलेल्या तळ गाठलेल्या विहीरीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे. ‘नाम फाऊंडेशन’ व भराडखेड्याचे रहिवाशी, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख तथा जालना कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब घुगे यांच्या पुढाकारातून ‘नाम’ च्या सहकार्याने भोरडी नदीसह स्थानिक नाल्यांचे खोलीकरण व रूंदीकरणाचे काम करण्यात आले. यासाठी केशव आघाव व राजाभाऊ शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात जलसंधारणाचे काम झाले. यासाठी ग्रामस्थांची चांगली साथ मिळाली. 2016 नंतर खरीप रब्बी पिकासह शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये फळबागा व भाजीपाला पिकाकडे वळले आहे. भोरडीला पाणी आल्यामुळे आजघडीला भराडखेडा, केळीगव्हाण, उज्जैनपुरी, राळा, राजेवाडी, रमदुलवाडी, साखरवाडी या परिसरामध्ये ‘नाम फाऊंडेशन’ने केलेल्या जलसंधारणच्या कामामुळे अमुलाग्र असा बदल होऊन पुन्हा फळबागा सेडनेटमधील भाजीपाला, शेतातील भाजीपाला उत्पादन पिके उभे राहिल्याचे आज रोजी आपणास दिसत आहे. यामध्ये रब्बी व खरीप पिकासह गहू 1000 एकर, ज्वारी 700 एकर, हरभरा 300 एकर, सोयाबीन 500 एकर, बाजरी 300 एकर, मक्का 1000 एकर, मुग -उडीड 300 एकर, भूईमुग 100 एकर; फळबागामध्ये मोसंबी 500 एकर, सिताफळ 300 एकर,डाळींब 600 एकर, केशर आंबा 100 एकर, शेवगा 50 एकर, अंगूर 50 एकर ; भाजीपाला पिकामध्ये मिरची 50 एकर, फुलगोबी 60 एकर, वांगे 70 एकर, टमाटे 200 एकर, भेंडी 50 एकर, कारले, दोडके 50 एकर, कांदा 100 एकर, सेटनेटमधील पालेभाज्या बिजोउत्पादन – मिर्ची – 50 एकर, शिमला मिर्ची 70 एकर, कारले 50 एकर, काकडी 50 एकर या प्रमाणे शेतकरी भोरडी नदीच्या पाण्यामुळे फळबागा, भाजीपाला व सेडनेटमधील बिजोत्पादनाकडे वळले आहे. यामुळे अभूतपूर्व परिवर्तन होवून मोजकेच खाण्यापुरते उत्पादन घेत असलेला शेतकरी लाखो रूपयाचे उत्पादन पिकांच्या माध्यमातून घेत आहे. परिणामी शेतकर्‍यांची आर्थिक उन्नती झाली असून शेतकरी या उत्पन्नातून शेतीपुरक व्यवसाय सुद्धा करू लागले आहे. शेळीपालन, कुक्कूटपालन यासह कृषि सेवा केंद्र, मोटार रिपेरींग, शेती अवजारे विक्री, नवीन ट्रॅक्टर, ट्रेम्पो, पिकअप, जिप,क्रुझर यासारखी वाहने खरेदी करून नवीन व्यवसायास सुरूवात केली आहे.
जमिनीचा पोत सुधारला ; अन भाव वधारला ! 2016 पासून ते आजपर्यंत संपूर्ण परिसर हिरवाईने नटल्यामुळे जमिनीच्या पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे भोरडी नदीच्या दुथडी व गावामध्ये वृक्ष लागवड करण्यात आली आहे. परिसरातील संपूर्ण कोरडवाहू शेती आता बारमाही बागायती झाली आहे. त्यामुळे जमिनीचे खाजगी दर व शासकीय रेडीरेकनरचे दर सुद्धा दुप्पटीने वाढले आहे. यामुळे काही शेतकर्‍यांना लाखो रूपयांचा फायदा झाला आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग आमच्या भराडखेडा या गावातून भोरडी नदीच्या परिसरातून गेल्यामुळे भराडखेडा, साखरवाडी व केळीगव्हाण या गावातील शेतकर्‍यांची जवळपास 50 ते 60 एकर शेत जमीन या कामासाठी संपादित करण्यात आलेली आहे.
2016 पुर्वी सदरील जमीन ही कोरडवाहू होती. ‘नाम’ ने केलेल्या कामामुळे, पाणी असल्यामुळे सदरील जमीन ही बागायती झाली व शेतकर्‍यांच्या कोरडवाहू जमीनीला काहींना हंगामी बागायती व काहींना बागायती दर शासनाकडून दिड पट व दुपटीने म्हणजे 30 लक्ष ते 40 लक्ष रूपये प्रती एकर याप्रमाणेशेतकर्‍यांना त्याचा मावेजा मिळाला. त्याचा आर्थिक फायदा शेतकर्‍यांना मिळाला. म्हणून ‘नाम’ फाऊंडेशनने भोरडी नदीच्या केलेल्या जलसंधारणच्या कामामुळे शेतकर्‍यांना पाणी मिळाले. गुरा-ढोराना, पक्षांना पाणी मिळाले. शेतकरी फळबाग, भाजीपाला पिकाकडे वळला. त्यांना आर्थिक उत्पन्नामध्ये भरमसाठ वाढ झाली. जलसंधारणाच्या कामामुळे शेतकर्‍यांच्या जमिनीचा भाव वाढला. याचे सर्व श्रेय हे ‘नाम फाऊंडेशन’ ला जाते. आमच्या नदीला नेहमी म्हटले जायचे ‘भोरडी व सदा कोरडी’ .परंतु आज मात्र भराडखेड्याची नदी भोरडी, ‘नाम’मुळे भरून वाहु लागली दुथडी, अशा शब्दात तिला गौरवांकीत केले जात आहे. भाऊसाहेब घुगे,जिल्हाप्रमुख – युवा सेना जालना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक