बदनापूर तालुका

बदनापूर नगरपंचायतीच्या गैरव्यवहाराच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाचे साखळी उपोषण


बदनापूर, ता. 4 (प्रतिनिधी) : बदनापूर नगरपंचायत प्रशासनाच्या गैरव्यवहाराची चौकशी करून भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी नगरपंचायतीच्या सार्वजनिक बांधकाम समितीचे सभापती राजेंद्रकुमार जायस्वाल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या वतीने बदनापूर नगरपंचायत कार्यालयासमोर शुक्रवार (ता. चार) पासून साखळी उपोषणास सुरवात करण्यात आली आहे.

बदनापूर येथील प्रभाग क्रमांक 7 मधील गणेशनगर भागात विकासकामांसाठी नगरपंचयतीच्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते ठराव घेण्यात आला. मात्र प्रत्यक्षात अद्याप कुठलीही कामे झालेली नाहीत. या संदर्भात चौकशी केली असता त्यास कुठलीही दाद दिली जात नाही. माझे सभागृहात म्हणणे ऐकले जात नसल्यामुळे मी अनेकदा सभात्यागही केला आहे. सर्वसाधारण सभा अवघ्या काही वेळातच गुंडाळल्या जातात. सभेला उपस्थित सदस्यांची बायोमेट्रिक पद्धतीने नोंद घेतली जात नाही.

एकूणच या भ्रष्ट व भोंगळ कारभाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली मात्र पदरी निराशाच पडली. कार्यालयातील अधिकारी मनमानी करून गैरव्यवहार करीत आहेत. या संदर्भात मुख्याधिकारी व एका कर्मचाऱ्यावर लाचलुचपत विभागाने कारवाईही केली आहे. माझ्या प्रभाग क्रमांक 7 मधील गणेशनगर भागात विकासकामे राजकीय दबावाखाली दुर्लक्षित केली जात आहे, त्याची सखोल चौकशी होऊन प्रत्यक्षात विकास कामे झाली पाहिजेत, या मागण्यांसाठी श्री. जायस्वाल यांच्यासह काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मोबिन खान, काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष शेख अनवर छोटूमियाँ, तालुकाध्यक्ष लक्ष्मण म्हसलेकर, तालुका उपाध्यक्ष शेख युनूस हुसैन, कलीम चौधरी, समाजसेवक प्रमोद साबळे, शेख अस्लम बाबू, शफी इनामदार, सुनील दाभाडे, शेख जावेद इब्राहिम, शेख नसीर, आसिफ शेख रशीद, शेख अलीम शेख हसन आदी साखळी उपोषण करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक