Breaking News
जालना जिल्हा

जिल्ह्यात प्रत्येय घरामधील व्यक्तींची पल्स ऑक्सीमीटर व थर्मलगनच्या सहाय्याने तपासणी व सूक्ष्म नियोजन करावे : आरोग्यमंत्री टोपे

जालना जिल्ह्यामध्ये “माझे कुटूंब, माझी जबाबदारी” मोहिम यशस्वीरित्या व प्रभावीपणे राबविण्यासाठी मोहिमेचे सुक्षम नियोजन करा- पालकमंत्री राजेश टोपे


न्यूज जालना ब्युरो दि. १२- कोविड-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 15 सप्टेंबरपासुन माझे कुटूंब, माझी जबाबदारी ही मोहिम दोन टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार असुन ही मोहिम जालना जिल्ह्यामध्ये यशस्वीरित्या व प्रभावीपणे राबविण्यासाठी मोहिमेचे सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले.


कोविड-19 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना टोपे बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रवींद्र परळीकर, उप विभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, शशिकांत हदगल, भाऊसाहेब जगताप, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, डॉ. संजय जगताप, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष कडले आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलतांना टोपे म्हणाले, माझे कुटूंब, माझी जबाबदारी या मोहिमेचा पहिला टप्पा १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरपर्यंत आणि दुसरा टप्पा १२ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर असा असणार आहे. यामध्ये घरोघरी जाऊन आरोग्य विषयक चौकशी केली जाणार असुन या मोहिमेचे सुक्ष्म असे नियोजन करण्यात यावे. यासाठी गावनिहाय पथकांची स्थापना करण्यात येऊन दरदिवशी किमान 50 घरामधील व्यक्तींची चौकशी तसेच पल्स ऑक्सीमीटर व थर्मलगनच्या सहाय्याने तपासणी करण्याचे नियोजन करण्यात यावे. कोरोना विषाणुचा मुकाबला करण्यासाठी देशात व राज्यात येत असलेले नवनवीन तंत्रज्ञान जालना जिल्ह्यात आणण्यासाठी आपण वैयक्तिकरित्या प्रयत्न करत असुन टेलिआयसीयु सुविधेमुळे जालन्यामध्ये होणाऱ्या मृत्युचे प्रमाण कमी करण्यामध्ये यश मिळाले असल्याचे सांगत जिल्ह्यात नव्याने टेलिईसीजी व टेलिरेडीओलॉजी या दोन सेवा लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचेही टोपे यांनी यावेळी सांगितले.


जालन्यातील कोरोनाचा वाढता आकडा कमी करण्यासाठी सहवासितांचा शोध व तपासण्या अधिक प्रमाणात करण्याबरोबरच अलगीकरणावर प्रशासनाने अधिक भर द्यावा. साधारणपणे एका बाधित व्यक्तीच्या संपर्कातील 10 ते 12 व्यक्तींचा शोध घेण्यात येत असुन ही संख्या वाढवत ती 20 ते 22 सहवासितांचा शोध घेण्यात येऊन त्यांचे तातडीने अलगीकरण करण्यात यावे. अलगीकरण केलेल्या व्यक्तीच्या स्वॅबचा अहवाल पाच दिवसानंतर घेण्याच्या सुचना करत जिल्ह्यात जे व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करत नाहीत तसेच सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही पोलीस विभागाला दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक