घनसावंगी तालुका

घनसावंगी तहसीलदारांच्या आदेशाला मंडळअधिकारी जुमेना !

कुंभार पिंपळगाव,दि.१४ : जालना जिल्‍ह्यातील मौजे कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी) येथील शेतकऱ्याचा मौजे राजाटाकळी शिवारातील शिवरस्‍ता मोकळा करून देण्‍याचे तहसिलदारांचे आदेश असतांनाही मंडळ अधिकारी तहसीलदार यांचा आदेशाला केराची टोपली दाखवली आहे .यातच देखावा म्हणून फक्त थातुरमातुर पंचनामा केला असल्याचा आरोप एका निवेदनाद्वारे करण्यात आला आहे याबाबत सोमवारी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यास सुरुवात झाली आहे

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी) येथील शेतकरी दत्‍तात्रय आसाराम सुरासे यांनी तहसिलदारांना दिलेल्‍या निवेदनानुसार, दत्‍तात्रय आसाराम सुरासे यांचे मौजे राजाटाकळी शिवारात शेत आहे.

दत्‍तात्रय सुरासे यांनी मौजे राजाटाकळी शिवारातील गट क्र.६० मध्‍ये जाण्‍यायेण्‍यासाठी शिवरस्‍ता मोकळा करून देण्‍याबाबत तहसिलदारांकडे अर्ज दाखल केला होता. काही दिवसांपूर्वी तहसिलदारांनी ४८ तासाच्‍या आत रस्‍ता मोकळा करून देण्‍याचे आदेश दिले होते.परंतु त्‍या आदेशाचे पालन न करता फक्‍त नावापुरता पंचनामा करण्‍यात आला, शिवाय दि.३ रोजी पुन्‍हा पोलीस बंदोबस्‍तात शेत रस्‍ता मोकळा करून देण्‍याचे आदेश देण्‍यात आले होते, परंतु मंडळ अधिकारी यांनी यावेळीही रस्‍ता मोकळा करून दिला नाही.

तहसिलदार दोन दोन वेळा आदेश देवूनही मंडळ अधिकारी मात्र तहसिलदारांच्‍या आदेशाला केराची टोपली दाखवत आहे. त्‍यामुळे दत्‍तात्राय सुरासे हैराण झाले आहेत.मंडळ अधिकारी तहसिलदारांचे आदेश धुडकावून जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्‍याने दत्‍तात्रय सुरासे यांनी दि.१४ रोजी तहसिल कार्यालयासमोर सहकुटुंब आमरण उपोषण करण्‍याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत घनसावंगी तहसीलदार नरेंद्र देशमुख यांना संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक