जालना जिल्हा

औरंगाबाद – नगर हायवेवर अडकलेल्या प्रवाशांची सोय; डब्ल्युएमओमुळे झाली मध्यरात्री मदत!

जालना न्यूज( ब्युरो दि १५ )- औरंगाबाद – अहमदनगर महामार्गावरुन मुंबईकडे जात असताना अचानक नादुरुस्त झालेल्या स्काॅर्पियो कारमधील प्रवाशांना रविवारी (ता.13) मध्यरात्री अवघ्या पंधरा मिनीटात मदत करुन डब्ल्युएमओ (वर्ल्ड मराठा आॅर्गनायझेशन) ने सामाजिक दायित्व जपले आहे. अशा प्रकारे रात्री तीन वाजता अचानक एक कार्यकर्ता मदतीसाठी धावून आल्याने जंगलात अडकलेल्या प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.

याबाबत सविस्तर असे की, जालना जिल्ह्यातील पाथ्रुड, आल्डा व लिंगसा या तीन गावातील काही नागरिक नातलगाच्या अंत्यविधीसाठी शनिवारी रात्री उशिरा एका स्काॅर्पियो कारने मुंबईकडे निघाले होते. त्यांची कार औरंगाबाद – अहमदनगर- शिक्रापुर -चाकण मार्गे मुंबईला जात असताना रविवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास पांढरी घाटात अचानक नादुरुस्त झाली. एवढ्या रात्री मेकॅनिक मिळत नसल्याने व पर्यायी वाहन उपलब्ध होत नसल्याने चालकाने प्रवाशांना रात्रभर तिथेच थांबण्याची विनंती केली. परंतु सोबत काही महिला असल्याने व सकाळी नऊ वाजता अंत्यविधीचा कार्यक्रम असल्याने प्रवासी घाई करीत होते.

याबाबत दैनिक आनंद नगरीचे पत्रकार साहिल पाटील यांना रात्री तीन वाजता फोनद्वारे माहिती मिळाली असता त्यांनी डब्ल्युएमओ फेसबुक ग्रुपवर मदतीची विनंती केली. अवघ्या सहा मिनीटात संदेश अॅप्रुवल करण्यात आला. पुढील काही मिनीटात अनेकांनी अहमदनगर येथील कार्यकर्त्यांचे नंबर दिले व काॅल करण्यास सांगितले.

पहिल्याच प्रयत्नात मनीष भालेकर यांनी काॅल घेतला व आपल्या स्काॅर्पियोसह अहमदनगर रोडवर दाखल झाले. अशा प्रकारे ऐन मध्यरात्री एक अनोळखी तरुण कार्यकर्ता मदतीला धावून आल्याने बिघाड झालेल्या कारच्या चालकासह प्रवासीही अवाक झाले होते. सर्व प्रवाशांना आपल्या स्काॅर्पियोमध्ये बसवून मनीष भालेकर यांनी सकाळी वेळेत मुंबईला सोडले व अंत्यविधी नंतर नगरपर्यंत आणुन सोडले. तोपर्यंत त्यांची जालना येथील स्काॅर्पियो कार दुरुस्त होऊन तयार होती. यासाठी डब्ल्युएमओचे संस्थापक प्रविण पिसाळ, अहमदनगर जिल्हा समन्वयक अनिकेत आवारे, प्रवीण थोरात, राजश्री कराळे यांच्यासह समुह सदस्यांनी मदत केली.


जय संघर्षचीही मदत – दरम्यान, नादुरुस्त झालेल्या स्काॅर्पियोबद्दल जय संघर्ष वाहन चालक संघटनेचे प्रसाद देशमुख यांना माहीती मिळताच त्यांनी मेकॅनिक व त्यांच्या सदस्यांना पाठवून सकाळी कार दुरुस्त करुन मदत केली.


प्रवाशांनी मानले आभार- मध्यरात्री तीन वाजता वेळेत मदत मिळाल्याने जालना जिल्ह्यातील प्रवाशांनी अहमदनगर येथील डब्ल्युएमओचे कार्यकर्ते व डब्ल्युएमओ समुहाचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक