वृत्तपत्रीय JPG तयार होत आहे...
जालना जिल्ह्याचे
विश्वसनीय डिजिटल न्यूज पोर्टल
न्यूज जालना
NEWS JALNA
जालना जिल्हा
ताज्या घडामोडी
आपल्या परिसरातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या
दिनांक : 25 नोव्हेंबर 2026घनसावंगी तालुकाजिल्हा बातमी

घनसावंगीत ऊसाच्या फडात थेट जिल्हाधिकारी! आशिमा मित्तल यांनी कामगारांशी साधला संवाद; MIDC ते नमो गार्डनची केली पाहणी

घनसावंगीत ऊसाच्या फडात थेट जिल्हाधिकारी! आशिमा मित्तल यांनी कामगारांशी साधला संवाद; MIDC ते नमो गार्डनची केली पाहणी

घनसावंगी | प्रतिनिधी

घनसावंगी तालुक्यातील ऊसतोड कामगारांचे प्रश्न, औद्योगिक विकास आणि शहरातील नागरी सुविधांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी बुधवारी (दि. २५ नोव्हेंबर) तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी थेट ऊसतोड सुरू असलेल्या शेतात जाऊन कामगारांशी संवाद साधला. त्यांच्या राहणीमानापासून ते मुलांच्या शिक्षणापर्यंत विविध प्रश्नांची माहिती जाणून घेतली.

ऊसतोड कामगारांच्या शेतातच जिल्हाधिकाऱ्यांची भेट!

ऊसतोडीसाठी शेतात राहणाऱ्या कामगारांची जिल्हाधिकारी मित्तल यांनी प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी कामगारांना पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा आणि राहण्यासाठी उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधांबाबत त्यांनी विचारपूस केली. तसेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सद्यस्थितीही जाणून घेतली.

ऊसतोड कामगारांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

घनसावंगीच्या MIDC बाबत काय घेतला आढावा?

तालुक्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या प्रस्तावित एमआयडीसी क्षेत्राचीही जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. औद्योगिक वसाहतीसाठी उपलब्ध जागा, रस्ते, वीजपुरवठा आणि पाण्याची सुविधा याबाबत अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. औद्योगिक प्रकल्पांच्या कामांना गती देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

नगरपंचायतीच्या कामकाजाचाही घेतला आढावा!

यानंतर घनसावंगी नगरपंचायत कार्यालयाला भेट देत त्यांनी विविध विभागांच्या कामकाजाची पाहणी केली. शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा, कर संकलन आणि प्रलंबित विकासकामांचा आढावा घेतला. नागरिकांना शासकीय सेवा वेळेत आणि पारदर्शकपणे मिळाल्या पाहिजेत, अशा सूचना त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.

'नमो गार्डन'चीही पाहणी

दौऱ्याच्या शेवटी जिल्हाधिकारी मित्तल यांनी घनसावंगी येथील 'नमो गार्डन'ला भेट दिली. उद्यानातील स्वच्छता, सुशोभीकरण, वृक्षारोपण, लहान मुलांची खेळणी आणि नागरिकांसाठी उपलब्ध सुविधांची पाहणी केली. उद्यानाची नियमित देखभाल करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

या दौऱ्यावेळी घनसावंगीचे तहसीलदार, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.