जालना | प्रतिनिधी
एकीकडे दुष्काळाचे संकट, दुसरीकडे रब्बी पिकांना पाण्याची गरज आणि त्यातच वीजबंदीचे आदेश... अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांचा कृषी वीजपुरवठा पूर्णपणे खंडित होऊ नये, यासाठी आमदार हिकमत दादा उढाण यांनी पुढाकार घेत प्रशासनाकडे जोरदार पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दररोज चार तास वीजपुरवठा सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले आहे.
जालना जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती गंभीर बनली आहे. जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य डाव्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आल्याने घनसावंगी, अंबड आणि परतूर तालुक्यांतील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पेरण्या केल्या आहेत. मात्र, पिकांना पाणी देण्याची गरज असतानाच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने २५ नोव्हेंबर २०२६ रोजी वीजबंदीचा आदेश लागू केला. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर पिके जगविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले होते.
शेतकऱ्यांची अडचण थेट प्रशासनासमोर!
ही परिस्थिती लक्षात घेऊन आमदार हिकमत दादा उढाण यांनी गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले. कृषी वीजपुरवठा पूर्णपणे बंद झाल्यास कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पिकांना वेळेवर पाणी देता येणार नाही. त्यामुळे उभ्या पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो, अशी भूमिका त्यांनी मांडली.
अनधिकृत पाणीउपसा रोखा; पण शेतकऱ्यांची वीज बंद करू नका!
जायकवाडीच्या डाव्या कालव्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पाणी पोहोचले पाहिजे. त्यासाठी अनधिकृत पाणीउपसा रोखण्यासाठी प्रशासनाने प्रभावी नियंत्रण ठेवावे. मात्र, त्याचवेळी रब्बी पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना दररोज आवश्यक तास वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी आमदार उढाण यांनी केली.
चार तास वीज सुरू ठेवण्याचे आश्वासन!
आमदार हिकमत दादा उढाण यांनी शेतकरी आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधत केलेल्या पाठपुराव्यानंतर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दररोज चार तास वीजपुरवठा सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे घनसावंगी, अंबड आणि परतूर तालुक्यांतील कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाऊ नये, यासाठी वीजपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आता प्रशासनाच्या आश्वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी आणि कशा पद्धतीने होते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

