भाजपची राज्यसरकारवरील टीका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा -अर्जुनराव खोतकर
मा.मंत्री खोतकर यांचा भाजपवर घणाघात टिका
न्यूज जालना ब्यूरो दि. 5
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे असा सर्वपक्षीय एकमुखी ठराव राज्य विधिमंडळात झालेला असताना आणि मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेली असतानाही मराठा समाजास आरक्षण मिळू शकले नाही. न्यायालयीन निकालावर टिपणी करता येत नसली तरी भारतीय जनता पक्षाने याबाबत राज्य सरकारला जबाबदार धरणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचे मत माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केले. मराठा आरक्षणाबाबत भाजप-शिवसेना युतीच्या काळात झालेला निर्णय आणि भाजपने दिलेला वकील कायम ठेवूनही भाजपने राज्य सरकारला जबाबदार धरणे म्हणजे भाजपच्या पोटात एक आणि ओठात एक भाषा असल्याचे सामान्य जनतेला कळून चुकले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांना अनेकदा वेळ मागूनही दिला गेला नाही. देशातील दोन राज्यात ५० टक्क्यापेक्षा अधिक आरक्षण दिले गेले आहे. राज्य विधीमंडळात सर्वपक्षीय निर्णय झालेला असतानाही तीन पक्षाच्या सरकारमध्ये एकमत नसल्याची टीका करणे हास्यास्पद आणि खोटारडेपणाचा कळस म्हणावा लागेल. आरक्षणाचा चेंडू आता केंद्र सरकारच्या कोर्टात आहे. ज्याप्रमाणे 370 कलम रद्द केले, ॲट्रॉसिटीचा निर्णय घेतला, तिहेरी तलाकचा निर्णय घेतला त्याप्रमाणेच मराठा आरक्षणासाठी कायद्यात बदल करू, असे भाजपकडून का सांगितले जात नाही, असा सवाल करून श्री खोतकर म्हणाले की भाजपचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. “ये पब्लिक है सब जानती है” असा टोलाही खोतकर यांनी लगावला.