कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत असलेले परिसर सील करा पालकमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश
सीएसआरच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात 100 बेडची संख्या असलेले रुग्णाल उभारण्याबरोबरच अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयाचे सक्षमीकरण करणार
दि. 15 (न्यूज जालना):- जिल्ह्यात कोरोना बाधित होण्याचा दर वाढत असुन वाढता संसर्ग रोखण्यासाठी आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढवत कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असलेले परिसर सील करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कोरोनाच्या अनुषंगाने आज दि। 15 मे रोजी अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री टोपे बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे , जिल्हा पोलीस अधिक्षक विनायक देशमुख, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे , निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके,उप विभागीय अधिकारी संदीपान सानप, अतिरिक्त पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख, जिल्हा शल्यचित्किसक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगांवकर, नगर परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी नार्वेकर, डॉ. संतोष कडले, डॉ. संजय जगताप, अन्न व औषध विभागाच्या श्रीमती अंजली मिटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री टोपे म्हणाले, जिल्ह्यात कोरोना बाधित होण्याचा दर वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोनामुळे मृत्युही होत आहे. जिल्ह्यात वाढत चाललेला संसर्ग रोखण्यासाठी आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढविण्याबरोबरच बाधित रुग्णांच्या सहवासितांचा अचुकपणे शोध घेण्यात यावा. ज्या भागामध्ये कोरोनाचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळत आहेत असे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरणारे परिसर पत्रे ठोकून सील करण्यात यावेत. तसेच
डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांसमवेत त्यांचे नातेवाईक थांबणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी. प्रत्येक कोव्हीड हेल्थ सेंटर, कोव्हीड केअर सेंटरवर नियुक्त करण्यात आलेल्या पोलीसांनी अधिक दक्ष राहण्याच्या सूचना करत खासगी रुग्णालतसुद्धा सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याचे निर्देशही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी दिले.
यावर्षी मान्सून वेळेत दाखल होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले असून या काळात जिल्ह्यात अधिक प्रमाणात पाऊस झाल्यास डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर तसेच कोविड केअर सेन्टरमध्ये कुठेही पाण्याची गळती होणार नाही तसेच पाणी साचणार नाही यासाठी आवश्यक त्या उपाययोजना पूर्वीच करण्यात याव्यात. अधिक पाऊस तसेच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेकवेळा वीज पुरवठा खंडित होतो.
त्यामुळे प्रत्येक डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर व कोविड केअर सेन्टरमध्ये वीज पुरवठा अखंडितपणे सुरू राहण्यासाठी जनरेटरची सुविधा उपलब्ध करून घेण्यात यावी. तसेच कुठल्याही प्रकारचे शॉटसर्किट होऊ नये यासाठी इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करून घेण्यात यावे. एखाद्या ठिकाणी अधिक प्रमाणात पाऊस झाला व रुग्णांना हलवण्याची वेळ आलीच तर अशा प्रसंगी पर्यायी व्यवस्था आधीच तयार ठेवण्याचे निर्देशही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी दिले.
म्युकर मायकोसिस आजार झालेल्या रुग्ण सध्या आढळत असून या आजाराबाबत प्रतिबंधात्मक उपाय योजनेबाबत जनमाणसामध्ये जाहिरात फलकाच्या माध्यमातून जनजागृती करण्याच्या सूचनाही पालकमंत्री यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.
बाधित असलेल्या प्रत्येक रुग्णांशी डॉक्टरांनी फोनद्वारे संवाद साधुन त्यांच्या प्रकृतीची चौकशी करत त्यांना होत असलेल्या त्रासाची माहिती दरदिवशी जाणुन घेऊन त्यांना उपचाराच्यासंदर्भाने आवश्यक ते मार्गदर्शन करण्याबरोबरच ज्यांना त्रास असेल अश्यांना तातडीने कोविड केअर सेन्टरमध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
कोरोना बाधित अथवा संशयित रुणांना कोव्हीड केअर सेंटरमध्ये सर्व सोयी-सुविधा प्राधान्याने मिळाव्यात. या ठिकाणची स्वच्छता दररोज होईल याकडे लक्ष देण्यात यावे. तसेच या ठिकाणी ठेवण्यात येणाऱ्या रुग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जाही उत्तम राहील, याची दक्षता घेण्यात यावी. रुग्णांची दररोज 6 मिनिट वॉकटेस्ट घेण्यात यावी, अशा सुचनाही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी दिल्या.
खासगी दवाखान्यात कोविड बधितांवर उपचारापोटी आकारण्यात येणाऱ्या देयकांचे दर शासनाने ठरवून दिले आहेत. रुग्णांना उपचारापोटी देण्यात येणारी देयके तपासण्यासाठी प्रत्येक खासगी दवाखान्यात परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून या परीक्षकांकडून प्रत्येक देयक काटेकोरपणे तपासले जाईल व नागरिकांकडून अधिकचे देयक घेतले जाणार नाही, याची जिल्हा प्रशासनाने दखल घेण्याची सूचनाही पालकमंत्री टोपे यांनी केली.
ब्रेक द चेन अंतर्गत राज्य शासनाने निर्बंधामध्ये 1 जून पर्यंत वाढ केली आहे. या निर्बंधांची जिल्ह्यात कडकपणे अंमलबजावणी होईल याची पोलीस प्रशासनाने दक्षता घेणाची सूचना करत शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात विनाकारण कोणी बाहेर फिरत असेल तर अश्यांवर कारवाई करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
राज्यातील ज्या जिल्ह्यात कोरोना बधित होण्याचा दर अधिक आहे अश्या 17 जिल्ह्यातील जिल्ह्याधिकाऱ्यांशी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे 20 मे, 2021 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार असून जिल्ह्यात बाधित होण्याचे प्रमाण का वाढत आहे, कंटेंटमेंट झोन किती आहेत, जिल्ह्यात उपलब्ध असलेली संसाधने तसेच त्याची मागणी याबाबत प्रधानमंत्री आढावा घेणार असल्याची माहितीही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी दिली.
जालना जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ग्रामीण रुग्णालयांना शववहिनी तसेच हवेतून ऑक्सिजन घेऊन त्यावर प्रक्रिया करून ऑक्सिजनची निर्मिती करणारे प्रकल्प उपलब्ध करून देण्यात येत आहेत. प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात बेडची संख्या 50 पर्यंत वाढवून पुरेशा प्रमाणात डॉक्टर, नर्स आदी मनुष्य बळही उपलब्ध करून देण्यात येत आहे. तालुक्याच्या ठिकाणी गंभीर रुग्णांना उपचारासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी संदभीत करण्यात येत होते. ग्रामीण भागातील रुग्णांना त्याच ठिकाणी उपचार मिळावेत यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था करण्यात आली असून डॉक्टरांना प्रशिक्षणही देण्यात आले असल्याची माहितीही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.
जिल्ह्यात असलेल्या 43 प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी 25 केंद्रांना रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या असून उर्वरित केंद्रांना लवकरच रुग्णवाहिका देण्यात येणार आहेत. सीएसआर माध्यमातून जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात 100 खाटांची संख्या असलेले व सर्व सुविधांनीयुक्त रुग्णालय उभारण्याबरोबरच अंबड येथील उप जिल्हा रुग्णालयाचेही सक्षमीकरण करण्यात येणार आहे. जालना येथे पहिल्या विद्युतदाहिनीची सुरुवात 19 मे पासून करण्यात येणार असल्याची माहितीही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी दिली.