कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांची माहिती 1098 या चाईल्ड हेल्पलाईन क्रमांकावर द्यावे:जिल्हाधिकारी जालना
न्यूज जालना, दि. 24 :- कोरोना महामारीच्या काळात जिल्ह्यात ज्या बालकांचे पालक कोव्हीड19 आजाराने गमावले असतील अशा बालकांचे संरक्षण, संगोपन तसेच कायदेशीर हक्क व पुनर्वसन व्हावे यासाठी कुठल्याही संस्था व व्यक्तींच्या भुलथापांना बळी न पडता अशा बालकांची माहिती 1098 या चाईल्ड हेल्प लाईन क्रमांकावर देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी केले.
कोवीड-19 च्या पार्श्वभूमीवर बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बिनवडे बोलत होते.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डी.पी. वाघमारे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीमती संगीता लोंढे,बालकल्याण समितीच्या अध्यक्षा श्रीमती ज्योती पत्की, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी गजानन इंगळे, विधी सेवा प्राधिकरणाच्या श्रीमती हुमा अन्सारी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी बिनवडे म्हणाले, बालकांना बाल संगोपन योजनेंतर्गत लाभाकरिता कृतीदलाची (टास्क फोर्स) ची स्थापना करण्यात आली असून अशा बालकांच्या मदतीसाठी चाईल्ड हेल्प लाईन नं. 1098 या क्रमांवर संपर्क साधून गरजूंनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करत जिल्हाधिकारी बिनवडे यांनी चाईल्ड हेल्प लाईन 1098 या बाबतचे माहितीफलक सर्व रुग्णालयांच्या दर्शनी भागात लावण्याच्या सुचनाही संबंधित विभागाला दिल्या.
कोव्हीड19 मुळे ज्या बालकांचे दोन्ही पालक अथवा एक पालकाचे निधन झाले असेल अशा बालकांना सर्वोतोपरी संरक्षण उपलब्ध करुन देणे व अशी बालके शोषणास बळी पडणार नाहीत किंवा बालकामगार अथवा तस्करी सारख्या गुन्हेगारीमध्ये सापडणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी. दर पंधरा दिवसातून एकदा टास्क फोर्सची बैठक आयोजित करण्यात यावी. अशा पालकत्व गमावलेल्या बालकांना त्यांचे कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यासाठी आवश्यकतेनुसार न्यायिक सल्ला व इतर सुविधा उपलब्ध करुन देणे. तसेच या बालकांचे आर्थिक व मालमत्ता विषयक हक्क अबाधित राहतील याकरिता दक्षता घेण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी बिनवडे यांनी यावेळी केल्या