जालन्यातील ह्या बारा रुग्णालयाने आकारले कोरोना रुग्णांना अधिक चे बिल ;ती रक्कम रुग्णांना परत देण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश
न्यूज जालना, दि. 24 :- कोरोना महामारीच्या काळात कोव्हीड बाधितांना योग्य उपचार देऊन शासन निर्णयानुसार देयक आकारण्याचे शासनाने बंधनकारक केले आहे. जालना जिल्ह्यात बारा खासगी रुग्णालयांनी रुग्णांना शासन नियमापेक्षा अधिकचे देयक आकारले असल्याचे तपासणीमध्ये निष्पन्न झाले आहे असुन त्या रुग्णालयांनी अधिकचे आकारलेले 17 लाख 52 हजार रुपये येत्या सात दिवसांमध्ये रुग्णांना परत करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी दिले.
जिल्ह्यातील बारा खासगी दवाखान्यांच्या प्रशासनासोबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थितांशी सवांद साधताना जिल्हाधिकारी बिनवडे बोलत होते.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, स्थानिक निधी लेखा परीक्षाचे सहाय्यक संचालक चंद्रकांत पाटील, सहाय्यक कोषागार अधिकारी दीपक जयवळ यांच्यासह जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांचे डॉक्टर्स व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी बिनवडे म्हणाले, कोरोना या महामारीच्या काळात शासकीय रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालये ही रुग्णांची अहोरात्र सेवा करत आहेत. परंतु खासगी रुग्णालयांनी कोव्हीड बाधितांवर उपचार करण्यासाठी शासनाने ठरवुन दिलेल्या दरानुसारच देयक आकारण्याचे बंधनकारक केले आहे. जालना जिल्ह्यातील प्रत्येक खासगी रुग्णालयांमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत देयके तपासण्यासाठी परीक्षकांची नियुक्ती केली असुन त्यामध्ये जिल्ह्यातील 12 दवाखान्यांनी शासन नियमापेक्षा 291 रुग्णांकडून एकुण 17 लाख 52 हजार 327 रुपये अधिकचे घेण्यात आले आहेत. शासन नियमापेक्षा रुग्णांकडून वसुल करण्यात आलेली रक्कम रुग्णांना येत्या सात दिवसांमध्ये परत करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी बिनवडे यांनी यावेळी दिले.
जालना जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांवर अधिक चांगल्या पद्धतीने उपचार व्हावेत तसेच रुग्ण बरा होऊन घरी जावा, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या पुढाकारातुन व जिल्हा प्रशासनामार्फत खासगी रुग्णालयांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन तसेच आवश्यक असलेल्या औषधींचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होईल, यादृष्टीने काळजी घेण्यात येऊन आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येत आहे. खासगी रुग्णालयांनीसुद्धा कोरोनाच्या काळात रुग्णांना चांगल्या प्रकारची वैद्यकीय सेवा देत शासन नियमानुसारच उपचारापोटी आकारावेत. काही रुग्णालये रुग्णांना उपचारापोटी पक्के देण्याऐवजी कच्चे देयक देऊन पैसे स्वीकारत असल्याच्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या तक्रारी येत आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक खासगी रुग्णालयात देयकांची तपासणी करण्यासाठी परीक्षकांची नियुक्ती केली असुन रुग्णाला उपचारानंतर सुटी देतांना देयक परीक्षकांच्या तपासणीनंतरच रुग्णांकडून देयक स्वीकारण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी बिनवडे यांनी यावेळी केले.
रुग्णांसोबत नातेवाईकांना कोव्हीड वार्डात प्रवेश देऊ नका
अनेकवेळा कोव्हीड बाधित रुग्णांवर उपचार करत असताना त्यांच्या नातेवाईकांना कोव्हीड वार्डात प्रवेश देण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. नातेवाईकांना कोरोना वार्डमध्ये प्रवेश दिल्याने कोरोनाचा संसर्ग फैलावण्याची शक्यता असल्याने कुठल्याही रुग्णालयांनी कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना कोव्हीड वार्डमध्ये प्रवेश न देण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.
17 लाख 52 हजार रुपयांची रक्कम 291 रुग्णांना परत करणार
कोरोनासोबतची लढाई जिंकण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे व समन्वयाने काम करण्याची गरज आहे. कोरोना महामारीच्या संकटात आपल्या रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला योग्य उपचार मिळुन तो हसतखेळत घरी गेला पाहिजे. कुठल्याही खासगी रुग्णालयाला व डॉक्टरला त्रास देणे हे जिल्हा प्रशासनाचे धोरण नक्कीच नसल्याचे स्पष्ट करत प्रत्येक रुग्णालयाने कोव्हीड बाधितांवर उपचारापोटी अधिकचे देयक न स्वीकारण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत निरामय हॉस्पीटल, जालना क्रिटीकल केअर , सांगळे हॉस्पीटल, ओजस हॉस्पीटल, विवेकानंद इन्स्टीट्युट ऑफ मेडीकल सायन्स, संतकृपा हॉस्पीटल, अंबेकर हॉस्पीटल, जालना हॉस्पीटल, सेवाभारती कोव्हीड हॉस्पीटल, व्यंकटेश्वर हॉस्पीटल, शिंदे बालरुग्णालय, जालना तर अंबड येथील सह्याद्री हॉस्पीटल या 12 रुग्णांलयांनी शासन दरापेक्षा अधिकचे आकारण्यात आलेले 17 लाख 52 हजार 327 रुपये 291 रुग्णांना परत करण्याचे मान्य केले.