Breaking News
मनोरंजन

एक थी बेगम’ ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला

गुन्हेगारी विश्वाच्या पूर्णपणे विरोधात असलेली, पाचवेळा नमाज आदा करणारी आणि कधीही मर्यादा न ओलांडणारी स्त्री या सूडाग्नीच्या ज्वाळेत कधी अशरफची सपना होते हे कळत नाही. मात्र ती सपना कशी होते? तिच्या सूडाचा पहिला बळी कोण ठरतो? हेही पाहणं रंजक आहे, विशेष म्हणजे मराठीबरोबर हिंदीतही अगदी फ्रीमध्ये ही वेबसीरिज प्रेक्षकांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
मुंबई नावाच्या मायानगरीच्या भूतकाळात बरंच काही दडलं आहे, या भूतकाळातील एक पान होतं बेगमच्या सूडाचं. ८० च्या दशकातील सत्य घटनेपासून प्रेरित होऊन एमएक्स प्लेअरनं नुकतीच ‘एक थी बेगम’ ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे.

कोणतीही गँग हाताशी नसताना केवळ बुद्धीचातुर्यानं ही बेगम रस्त्यात येणाऱ्याला शह देत पुढे सरकत जाते. वाटेत येणाऱ्या सगळ्यांची शिकार केल्यानंतर या बेगमची मोठी शिकार अजूनही मोकाट असते त्या शिकारीपर्यंत पोहोण्यात बेगम यशस्वी होते की तिचाही तिच्या शोहरसाखाच दुर्दैवी अंत होतो हेही शेवटपर्यंत पाहणं तितकंच कुतूहल ताणणारं आहे.

अनुजा साठेनं साकारलेली अशरफ ही सीरिज संपल्यानंतरही शेवटपर्यंत लक्षात राहते. अनुजानं यापूर्वी मराठी, हिंदीत अनेक भूमिका साकारल्या आहेत. साधी, शालिन, सुंदर ‘अशरफ’ आणि नवऱ्याच्या खूनानंतर सूडानं पेटलेली ‘सपना’ ही अनुजानं उत्तम साकारली आहे. सपना म्हणून वावरताना मनात असलेला राग, सूड आणि अशरफच्या जगात वावरताना दु:ख, हळवेपणा या सर्वांच्या कोलाहलात सापडलेली बेगम अनुजानं प्रभावीपणे उभारली आहे. अंकित मोहननं साकारलेला झहीर हा काही भागांपुरताचा सोबती असला तरी, तोही तितकाचा प्रभावी दाखवला आहे. काही झालं तरी मुंबईत अमली पदार्थांचा बाझार होता कामा नये असं म्हणून आपल्या मर्यादा जाणणारा गुन्हेगार अंकितनं साकारला आहे.

या सीरिजमध्ये बहुतांश चेहेरे हे मराठी आहेत, ज्यांनी मराठी मनोरंजन विश्वात आपली ओळख निर्माण केली आहे. चिन्मय मांडलेकरनं साकारलेला स्वच्छ इमेज असलेला इन्सपेक्टर भोसले, अभिजित चव्हाण यानं साकारलेला भ्रष्ट पोलिस तावडे, राजेंद्र शिसातकर यानं साकारलेला नाना म्हात्रे यांसारख्या कलाकारांचा अभिनय सीरिजमध्ये छाप सोडतात.

सीरिजमध्ये अशी अनेक दृश्य आहेत जी ८० च्या दशकातील मुंबईच्या आठवणी पुन्हा जागवतात. काही दृश्य पुन्हा त्या काळात घेऊनही जातात. आतापर्यंत गुन्हेगारला केंद्रस्थानी ठेवून वेबसीरिज आल्या आहेत मात्र मराठीत महिला माफिया क्वीनवरचा हा कदाचित पहिलाच प्रयोग असेल, त्यामुळे या विश्वात डोकावून पाहायला हरकत नाही.

सचिन दरेकर लिहित, दिग्दर्शित या सीरिजमध्ये अजुना, अंकितसोबतच चिन्मय मांडलेकर, अभिजित चव्हाण, संतोष जुवेकर, राजेंद्र शिसातकर, रेशम, प्रदीप डोईफोडे, विठ्ठल काळे, नाझर खान, विजय निकम, अनिल नगरकर, सुचित जाधव, राजू आठवले यांसारखे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक