शेतीविषयक

ग्रामीण भागात कोरोनामुळे दूध व्यावसायिक अडचणीत

ग्रामीण भागात कोरोनामुळे दूध व्यावसायिक अडचणीत
वडीगोद्री न्यूज

जगभरात कोरोनाने थैमान घातल्याने मात्र ग्रामीण भागात अनेक व्यवसाय डबघाईला आले आहे त्यातच दूध व्यवसायाला ही मोठा फटका बसत आहे. यामुळे हजारो लिटर दुध हे शिल्लक राहत असल्याने काही व्यवसायीकाना दूध हे रस्त्यावर टाकून देण्याची वेळ आली आहे .
अंबड तालुक्यातील ग्रामीण भाग हा शेतीशी निगडित असणाऱ्या दूध व्यवसायावर अवलंबून आहे.उन्हाळ्यात दुधाचे भाव जास्त मिळतात मात्र लॉक डाऊनमुळे अल्पदरात दुधाची विक्री करावी लागत आहे.त्यामुळे दूध व्यवसायावर संक्रांत आली असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
कोरोनामुळे कधी नव्हे तो दूध व्यवसाय ऐन उभारीच्या काळात शेतकऱ्यांवर हे लॉक डाऊन चे संकट उभे राहिले आहे दूध व्यवसाय ज्यावर अवलंबून आहे ते हॉटेल्स,शीतपेयाची दुकाने,रेस्टॉरंट, मिठाई,लग्नसमारंभ,दुग्धजन्य पदार्थ,लस्सी,ताक यासाठी लागणारे दूध हे दुकाने बंद असल्याने त्यांना देणारे दूध मोठ्या प्रमाणावर पडून आहे.
घरगुती ग्राहकांनाच फक्त दुधाचा पुरवठा केला जातोय.पण पडून असलेले दूध व्यापारी कमी भावाने खरेदी करताय.यात नुकसान दूध उत्पादकांचे होते.
काही उत्पादक उरलेल्या दुधापासून खवा,कालाकंद,दही इत्यादी दुग्धजन्य पदार्थ करीत आहेत.मात्र त्याला मागणी हवी तशी नाहीये. त्यातच हे पदार्थ नाशवंत असल्याने जास्त काळ साठवूनही ठेवता येत नाही.अशात मग नाईलाजाने कमी किमतीत ते द्यावे लागत आहे.परिसरातील फक्त चहाच्या हॉटेल्ससाठी हजारो लिटर दूध लागते. ती सर्व हॉटेल देखील सध्या बंद आहेत.४० ते ५० रुपये लिटरने उन्हाळ्यात मागणी असणारे दूध आज कोरोनाच्या संकटामुळे २५ ते ३० रुपये लिटर प्रमाणे शेतकऱ्यांना द्यावे लागत आहे.
पशुखाद्य यांचे भाव मात्र वाढलेले असल्याने शेतकऱ्यांपुढे संकट निर्माण झाले आहे.उलटपक्षी अवकाळी पावसामुळे चाऱ्याचा तुटवडा झाला आहे.कोरोनामुळे काही व्यापारी पशुखाद्याची चढ्या दराने विक्री करीत आहेत.तसेच काही ठिकाणी पशुखाद्याची साठेमारी होते आहे.सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.आधीच शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे.आता सरकारने मदत करावी व दूध व्यवसायाला संजीवनी द्यावी,याच प्रतीक्षेत दूध उत्पादक आहेत.

”कोरोनामुळे दूध व्यवसाय हा पुर्णतः तोट्यात आला आहे.दुधाचा भाव हा आजरोजी २० रुपये लिटरप्रमाणे असूनही पूर्ण दूध विकल्या जात नाही.यात जनावरांना लागणाऱ्या पेंडीचा सुद्धा खर्च निघत नाही. दुग्धजन्य पदार्थ करून विकायचे म्हंटले तर त्याला कोणीही घेत नाही.यामुळे दूध उत्पादक शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या अडचणीत सापडला असून शासनाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी अरुण चेपटे यांनी केली आहे

तर
”दूध व्यवसाय हा डबघाईला आलेला आहे.आजरोजी सुमारे १४० ते १६० लिटर दुध दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी दूध डेरीला आणून देत आहे.पण दुधाला लॉक डाऊनमुळे कुठल्याही प्रकारची मागणी राहिलेली नाही.तसेच दुधाचे भाव सुद्धा एकदम कमी झाले
आहे.त्यात भर म्हणून जनावरांना लागणाऱ्या पेंढीचे भाव गगनाला भिडले आहे.यामुळे दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे… गणेश गर्जे,चेअरमन,माऊली दुग्ध संस्था,रामगव्हाण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक