धार्मिक

स्वाध्याय परिवारातर्फे महाराष्ट्रात निर्जंतुकीकरणासाठी विशेष फाॅगिंग

मुबई न्यूज – स्वाध्याय परिवारातर्फे महाराष्ट्रात निर्जंतुकीकरणासाठी विशेष फाॅगिंग मशिन्स हिंदुस्थानात कोरोना विषाणू रूपी महामारी वेगाने पसरत आहे आणि संपूर्ण हिंदुस्थान सर्वशक्तीनिशी एकजुटीने त्याचा प्रतिकार करत आहे. या परिस्थितीत शहरे निर्जंतुक करणे ही अत्यावश्यक बाब लक्षात घेत परम पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले (दादा) प्रेरित स्वाध्याय परिवारातर्फे मुंबईत निर्जंतुकीकरण करण्यासाठी प्रचंड ताकदीच्या 5 फॉगिंग मशिन्स प्रदान करण्यात आल्या आहेत.स्वाध्याय परिवाराने आरोग्य विभागाला दिलेली ही विशेष फॉगिंग मशिन्स जाहीर निर्जंतुकीकरणासाठी वरदानरूप ठरतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

मुंबई सारख्या मोठ्या शहरात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रचंड क्षमतेच्या फॉगिंग मशिन्सची गरज आहे. स्वाध्याय परिवारातर्फे देण्यात आलेल्या या फॉगिंग मशिनची विशेषता अशी आहे की, हे मशिन एकावेळी 600 लिटर पेक्षा जास्त प्रवाही द्रव्य साठवू शकते, सतत दीड तास फवारणी करू शकते तसेच जवळपास 30 चौरस मीटर इतके क्षेत्र एकावेळी कव्हर करू शकते.

विदेशांत फॉगिंग मशिन्स द्वारे विशेष जंतुनाशकांची फवारणी करून अनेक हमरस्ते तसेच अनेक वस्त्यांचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. स्वाध्याय परिवारातर्फे अशा प्रकारची विशेष 5 फॉगिंग मशिन्स महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाला शनिवारी दिनांक 11 एप्रिल रोजी भायखळा येथे अग्निशमन दलाच्या मुख्यालयात उपमुख्य अग्निशमन अधिकारी चौधरी व अग्निशमन दलाच्या इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आली. या मशिन्स मुंबई, नवी मुंबई व ठाणे परिसरात निर्जंतुकीकरणासाठी वापर करण्यात येईल. अग्निशमन दलाच्या साहाय्याने ही मशिन्स उपयोगात आणली जातील.

यासोबत स्वाध्याय परिवाराने वैद्यकीय क्षेत्रात जिवावर उदार होऊन सेवा बजावणाऱ्या अनेकांसाठी मास्क्स (masks) याआधीच आरोग्य विभागाला प्रदान केले होते. तसेच मुंबईप्रमाणे महाराष्ट्रात नाशिक, अहमदनगर व नांदेड येथे पण अशा प्रकारची फॉगिंग मशिन्स स्वाध्याय परिवाराकडून देण्यात येणार आहेत तर गुजराथ मधील अहमदाबाद, बडोदा, राजकोट, भावनगर, सुरेंद्रनगर, भुज या शहरात अशी अनेक मशिन्स। यापूर्वीच दिली गेली आहेत. त्याबरोबरच मास्क, हँडग्लोव्हस तसेच सॅनिटायझर असे एकत्र असणारे 30 हजार किट्स आजपर्यंत स्वाध्याय परिवाराने दिलेले आहेत. स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख सौ. धनश्रीदीदी तळवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम स्वाध्याय परिवारातर्फे होत आहे.अर्थात स्वाध्याय परिवारातर्फे दिली जाणारी कुठलीही वस्तू किंवा संयंत्र कोरोना संक्रमणासारख्या या विपरीत काळात सामाजिक भान व नैतिक कर्तव्य म्हणून समाजाला दिलेले एक छोटेसे योगदान असल्याची भावना परिवारातर्फे व्यक्त करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक