Breaking News
जालना जिल्हाजालना तालुकाशेतीविषयक

जालना तालुक्यात फुलशेतीला कोरोनाचा फटका ,फुलांची झाडे उपटून फेकली बांधावर

रामनगर: लॉकडाऊन वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटात


रामनगर न्यूज (ता जालना): कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यभर ३ मेपर्यंत लॉकडाऊनचे दिवस वाढवण्यात आले आहे. दरम्यान यामुळे जालना तालुक्यातील रामनगरसह परिसरातील फूलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. विशेष म्हणजे १४ एप्रिल नंतर बाजारपेठ सुरू होईल या आशेवर शेतकर्‍यांनी फुले पदरमोड करून जोपासली होती. परंतु आता विक्री अभावी डोळ्यादेखत बहरात आलेली फुलझाडे नाईलाजाने तोडून टाकावे लागत आहे. परिणामी फुलांची विक्री होत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे दिसत आहे.
मागील २५ मार्चपासून जालना तालुक्यातील रामनगरच्या आठवडी बाजारासह परिसरातील सर्वच गावोगावचे रस्ते बंद करण्यात आले आहेत. बहुतांश शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने पदरमोड करून फुल शेती जोपासली होती. दरवर्षी चैत्र पोर्णिमा, श्रीराम नवमी, गुढीपाडवा, हनुमान जयंती आदी उत्सवाच्या दिवसात फुलांना चांगली मागणी असते. यंदा मात्र मागणीच नसल्याने
फुले जागेवरच कोमेजून खराब होत आहेत. दरम्यान कोरोनाच्या महामारीमुळे राज्यभर ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढले आहे. यामुळे रामनगरसह ग्रामीण भागात संचारबंदी लागू करण्यात आली असून सर्वत्र शुकशुकाट पसरलेला आहे. दिवाळीनंतर नोव्हेंबर ते जुन हा लग्नसराईचा हंगाम असतो. यामध्ये लग्नसराईत नवरदेव गाडी सजावट, स्टेज डेकोरेशन, मंगल कार्यालय सजावट, वधू-वर पुष्पहार, तसेच इतर वाढदिवस, दुकान उद्घाटण या सारख्या विविध कार्यक्रमांसाठी फुलांची मोठी मागणी असते. यंदा ऐन लग्नसराईत कोरोनाच्या संकटाने अनेकांवर उपासमारीची वेळ आनली आहे. लग्नसराईत गर्दी करण्यास प्रतिबंध असल्याने लग्न समारंभ रद्द करण्यात आले आहेत. ऐन बहरात आलेली गुलाब, मोगरा, गलांडा, चाफा यासारखी विविध प्रकारची फुले नाईलाजाने तोडून टाकावे लागत आहे. पावसाचे कमी होणारे प्रमाण, बाजारपेठेत मिळणारा कवडीमोल भाव, कर्जबाजारीपणा आणि यंदाच्या कोरोना महामारी यासारख्या सततच्या संकटाने शेतकरी पुरते हतबल झालेले आहेत. त्यामुळे शासनाने फुल उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून केली जात आहे.

रामनगर: लॉकडाऊन वाढल्याने विक्रीअभावी बहरात आलेली फुलझाडे उपटून टाकताना महिला शेतकरी.(छायाचित्र: बबनराव वाघ )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक