गुंज गावातील पाच दिवसांपासून पाणीपुरवठा बंद,ग्रामपंचायतने लक्ष देण्याची मागणी
घनसावंगी प्रतिनिधी /
गुंज गावात मागील पाच दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे पावसाळा सुरू झालेला असतानाही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गुंज येथील पाणीपुरवठा वारंवार कोणत्या ना कोणत्या कारणाने बंद होत असतो. त्यामुळे गुंजवासीयांना नळाच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. पाणीपुरवठा योजनेवर लाखो रुपये आतापर्यंत खर्च झाले परंतु येथील पाणीपुरवठा सुरळीत केव्हा होणार असा प्रश्न गुंजवासीयांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे.
एका मजुरांच्या साहाय्याने पावसाच्या तोंडावर मुख्य पाईप लाईन दुरुस्ती करणे सुरू केले होते. परंतु त्या मंजुराचे मागिल चार महिन्यांचे पैसे थकीत असल्यामुळे अर्ध्यातुन पाईप लाईन दुरुस्ती त्यांने बंद केले. त्यामुळे पाणी केव्हा सुरू होईल हा प्रश्न निर्माण झाला आहे
अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा व लोकप्रतिनिधींची उदासीनता, यामुळे गुंज गावातील पाणी पुरवठा सुरळीत झालेला नाही. नागरिकांच्या समस्यांकडे ग्रामपंचायत प्रशासन डोळेझाक करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. या समस्येने नागरिक त्रस्त असून पाणीपुरवठ्यावर कायमचा उपाय शोधून ही समस्या दूर करावी, प्रलंबित असलेली कामे त्वरित पूर्ण करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.