जालना जिल्ह्यात अत्याधुनिक पाच फिरत्या दवाखान्यांचे लवकरच उदघाटन
जालना, दि. 2 :- राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे हे जालना जिल्ह्यात आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्नशिल आहेत. त्याचाच एक भाग म्हणुन आय.सी.आय.सी.आय. फाऊंडेशनच्या सहकार्याने जालना जिल्ह्यासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या पाच फिरत्या दवाखान्यांचे लोकार्पण शुक्रवार दि. 4 फेब्रुवारी, 2022 रोजी जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात सकाळी 9-00 वाजता ना. राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
आय.सी.आय.सी.आय फाऊंडेशनच्या सामाजिक दायित्व निधीतुन देण्यात आलेल्या या फिरत्या दवाखान्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असुन जिल्ह्यातील नागरिकांना प्राथमिक उपचारासाठी हे दवाखाने अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. भारतामध्ये प्रथमच या फिरत्या दवाखान्यामध्ये मोबाईल ट्रॅकिंग सिस्टीम तसेच डॉक्टर-पेशंट ॲप या आधुनिक पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातुन सर्वसामान्य नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, मोफत औषधी उपलब्ध करण्याबरोबरच मोफत फस्टएड व ड्रेसिंग सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच या दवाखान्यातुन मधुमेह, उच्च रक्तदाब तपासणीही मोफत स्वरुपात करण्याबरोबरच कोव्हीड चाचणीची सोयही या वाहनात उपलब्ध होणार आहे.