जालना जिल्ह्यात वायू वेग पथकाची धडक मोहीम; ६५ वाळू वाहतूक वाहनांवर कारवाई, ₹१२.५३ लाख दंड

जालना, दि. ११ जून २०२५ —
जालना जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीवर आळा घालण्यासाठी आरटीओच्या वायू वेग पथकाने मागील पाच दिवसांत विशेष तपासणी मोहीम राबवून ६५ वाहने पकडली असून एकूण ₹१२,५३,०००/- इतका दंड आकारण्यात आला आहे.
ही मोहीम उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. चंद्रमोहन चिंतल यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये ही तपासणी मोहीम झाली असून विशेषतः नोंदणी क्रमांक नसलेली, भार क्षमतेपेक्षा अधिक वाळू वाहतूक करणारी, तसेच अवैध टिप्पर आणि हायवा वाहनांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले.
कारवाईदरम्यान खालील नियमभंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली:
विना नोंदणी क्रमांक, विना परवाना, विना विमा, कालबाह्य फिटनेस प्रमाणपत्र, विना रिफ्लेक्टर, रस्त्यांवर दृष्टीस त्रासदायक (dazzling) लाइट्स
या कारवाईत विना नोंदणी क्रमांक असलेली काही वाहने जप्त करण्यात आली आहेत.
ही कारवाई मोटार वाहन निरीक्षक श्री. भीमराज नागरे, श्रीमती संजीवनी चोपडे, सहायक निरीक्षक श्री. अमोल राजपूत, श्री. राजकुमार मुंडे, श्रीमती राधा साळुंखे व चालक आसाराम घुले, भागवत पारिस्कर व इतर पथक सदस्यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडली.
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. चंद्रमोहन चिंतल यांनी यावेळी सांगितले की,
“विना नोंदणी क्रमांक असलेली वाहने तसेच अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर विभाग कठोर भूमिका घेत आहे. अशा प्रकारचे वाहनचालक हे कायद्याला धक्का देणारे असून त्यांच्यावर सातत्याने धडक कारवाई केली जाईल. सार्वजनिक रस्त्यांवरील शिस्त आणि सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी ही मोहिम अधिक तीव्र करण्यात येणार आहे.”