ऑक्सीजन प्रकल्पामुळे गरजु लोकांना लाभ होईल :आ. गोरंट्याल

जालना (प्रतिनिधी) : स्वयंचलित पध्दतीने निर्मिती होणाऱ्या ऑक्सीजन प्रकल्पामुळे रूग्णांची ऑक्सीजनसाठी होणारी परवड थांबणार असून जास्तीत जास्त गरजूंना या प्रकल्पामुळे फायदा होईल असा विश्वास आ. कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केला आहे.
जिल्हा स्त्री रूग्णालयात 500 लिटर प्रति मिनिटाने स्वयंचलित पद्धतीने ऑक्सिजन निर्मिती करण़ाऱ्या नवीन ऑक्सिजन प्लान्टचे गुरूवारी आ. कैलास गोरंट्याल यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा स्त्री रूग्णालयाचे अधीक्षक राजेंद्र पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पद्मजा सराफ, डॉ. केतन चव्हाण, डॉ. संतोष जायभाये, मनिष जाधव, डॉ. वैशाली पंडित, डॉ. बेदरकर, डॉ. पालवे, डॉ. गौळ, डॉ. स्मिता पंडित, डॉ. घोलप आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलतांना आ. गोरंट्याल म्हणाले की, करोनाच्या कठीण काळात ऑक्सीजनचे महत्व सर्वांनाच पटले आहे. गोर-गरीब व गरजु रूग्णांची गरज लक्षात घेवून राज्यशासनाने जिल्हा स्त्री रूग्णालयात
500 लिटर प्रति मिनिट वेगाने ऑक्सिजनची निर्मिती करणाऱ्या या प्रकल्पाला मंजुरी दिली असून या प्रकल्पाच्या माध्यमातून साठवणूक क्षमता 1500 लिटर इतकी आहे. या प्रकल्पामुळे जिल्हा स्त्री रूग्णालयातील नवजात बालके, गरोदर मातांना लागणाऱ्या ऑक्सिजनचा प्रश्न मार्गी लागला आहे.