ओबीसींच्या मागण्यांसाठी गोर सेनेचा आमदारांच्या घरावर मोर्चा
जालना प्रतिनिधी :
इतर मागासवर्गीय घटकांचे संवैधानिक आरक्षण पुर्ववत करावे,ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी, भटक्या विमुक्तांना रखडलेल्या पदोन्नती देण्यात याव्यात, लोकसंख्येनुसार ओबीसींना वाटा मिळायला हवा,27% आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशा प्रलंबित मागण्यांकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी गोर सेनेच्या वतीने सोमवारी ( ता. 15) आ. कैलास गोरंट्याल यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढून निवेदन दिले तसेच भ्रमणध्वनी वरून चर्चा केली.
ओबीसी व भटक्या विमुक्तांच्या न्याय मागण्यांसाठी गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण,प्रदेशाध्यक्ष
संपत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जालना जिल्ह्यात गोर सेनेने या पुर्वी निवेदने, धरणे आंदोलन, साखळी उपोषणे केली तरीही केंद्र आणि राज्य शासनाकडून दखल घेतली जात नसल्याने लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी गोर सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मुरलीधर राठोड व जिल्हा सचिव रवींद्र राठोड
यांच्या नेतृत्वाखाली गोर सेनेच्या पदाधिकारी व गोर सैनिकांनी आ. कैलास गोरंट्याल यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढला. लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसींना वाटा मिळालाच पाहिजे…, स्वतंत्र जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे..ओबीसींना 27% आरक्षण पुर्ववत करा…भटक्या विमुक्तांना पदोन्नती मधील आरक्षण कायम करा…, अशा गगनभेदी घोषणा देत गोर सैनिकांनी परिसर दणाणून सोडला. निवासस्थाना समोर आ. कैलास गोरंट्याल यांच्या स्वीय सहाय्यकांनी लेखी निवेदन स्विकारले. या वेळी मुरलीधर राठोड, रवींद्र राठोड, गणेश राठोड, पंकज राठोड, रितेश पवार, बाळू राठोड, किरण राठोड, रामेश्वर आढे, अंकुश चव्हाण, अजय चव्हाण , अमोल राठोड, सचिन राठोड, सतीश राठोड यांच्या सह पदाधिकारी व गोर सैनिकांनी सहभाग नोंदवला.
हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार: आ. गोरंट्याल
इतर मागासवर्गीय आणि भटक्या विमुक्तांना संवैधानिक अधिकार, आरक्षण मिळावे या साठी आपण सकारात्मक असून हिवाळी अधिवेशनात या संदर्भात आवाज उठवणार असल्याची हमी आ. कैलास गोरंट्याल यांनी दिली. आंदोलकांनी भ्रमणध्वनी वरून त्यांच्याशी संपर्क साधला असता आ. गोरंट्याल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच प्रदेशाध्यक्ष संपत चव्हाण यांच्याशी ही चर्चा केली. असे रवींद्र राठोड यांनी सांगितले.