आपल्या गावाचे शंभर टक्के लसीकरण होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा-पालकमंत्री राजेश टोपे
न्यूज जालना दि. 18
कोरोनाचे संक्रमण वाढू नये यासाठी जिल्ह्यात अधिकाधिक प्रमाणात कोविड प्रतिबंधक लसीकरण होण्याकरीता लसीकरण मोहिम प्रत्येक गावात, शहरात प्रभावीपणे राबवावी, यासाठी सरपंच, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक यांनी पुढाकार घ्यावा आपल्या गावाचे शंभर टक्के लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले.
दूरदृश्य प्रणालीद्वारे पालकमंत्री श्री. टोपे यांनी सदर लोकप्रतिनिधींशी आज संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड,मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) संजय इंगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विवेक खतगावकर, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. जयश्री भुसारे आदी उपस्थित होते. तर दुरदृश्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील, सरपंच, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक हे उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले की, कोरोना आजाराचा संसर्ग होऊ नये यासाठी लस घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मात्र अजुनही अनेकजणांनी लस घेतलेली नाही. आपले गाव, शहराचे शंभर टक्के लसीकरण करुन घेण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. या लसीकरण मोहिमेसाठी आरोग्य विभागाचे आपणास संपुर्ण सहकार्य राहील. लसीकरण मोहिमेसाठी ग्रामसेवक, आशा, अंगणवाडी सेविका यांची टीम बनविण्यात आली आहे. घरोघरी जाऊन सर्वेक्षण, नोंदणी, जनजागृती आणि लोकांनी लसीकरण केंद्रावर येण्याकरीता प्रवृत्त केले जात आहे. पण अद्यापही अनेकजण लसीकरणासाठी पुढे येत नाहीत. त्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करण्यात यावे. आपल्या गावाचे शंभर टक्के लसीकरण पुर्ण करुन घेणे ही आपली जबाबदारी आहे. या भावनेतुन आपला सहभाग व सहकार्य अपेक्षित असल्याचे श्री. टोपे यांनी सांगितले.गावात, शहरात लसीकरणाची ही मोहिम मिशन मोडवर राबविण्यात यावी, असेही ते म्हणाले.
यावेळी पालकमंत्री यांनी लसीकरणाबाबत सरपंच, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक यांच्याकडुन अडचणीही जाणुन घेतल्या तर अनेक लोकप्रतिनिधींनी आपल्या गावात शंभर टक्के लसीकरणाची हमीही यावेळी दिली. गावामध्ये शंभर टक्के लसीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी, प्रभात फेरी, दवंडी, लाऊडस्पीकर याद्वारे आवाहन करण्याबरोबरच लसीकरण मोहिमेच्या यशस्वीतेसाठी काटेकोर नियोजन करण्याची सूचना पालकमंत्री यांनी प्रशासनाला केली.
जिल्हाधिकारी यांनी हर घर दस्तक अभियानातंर्गत घरोघरी जाऊन नागरिकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करण्याचे आवाहन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लसीकरणाच्या सद्यस्थितीची माहिती दिली सुत्रसंचालन डॉ. खतगावकर यांनी केले.