जालना क्राईम

२० मिनिटांत लांबविले १९ लाख ७६ हजारांचे दागिनेसराफा दुकान फोडले : गस्तीवरील पोलिस गेले अन् चोरटे आले

images (60)
images (60)

जालना : एक सराफा दुकान फोडून केवळ २० मिनिटांतच १९ लाख ७६ हजार ५०० रूपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. ही घटना बुधवारी पहाटे कुंभार पिंपळगाव (ता.घनसावंगी) येथे घडली. विशेष म्हणजे पोलिसांचे गस्तीवरील वाहन जाताच चोरट्यांनी सराफा दुकानात घुसून ही चोरी केली.


कुंभार पिंपळगाव येथील मुख्य बाजारपेठत ज्ञानेश्वर मधुकर दहिवळ यांचे सराफा दुकान आहे. कारमधून आलेल्या चोरट्यांनी बुधवारी पहाटे ३:४१ वाजण्याच्या सुमारास दुकानाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. दुकानातील पाच तोळे नाकातील सोन्याच्या मोरण्या, दोन तोळे कानातले सोन्याचे कुडके, सात ग्रॅम कानातील सोन्याचे हुजुर, एक तोळे कानातील सोन्याचे झुंबर, दोन तोळे सोन्याचे गळ्यातील नेकलेस, कानातील सोन्याचे वेल, एक तोळा दोन ग्रॅम सोन्याचे पेंडल, एक तोळा सोन्याची मोड, आठ किलो चांदीचे पायातील चैन, एक किलो चांदीचे पायातील जोडवे, किलो चांदीची गळ्यातील साखळी, एक किलो चांदीच्या हातातील अंगठ्या, पाचशे ग्रॅम चांदीचे हातातील ब्रासलेट, पाचशे ग्रॅम चांदीचे हातातील कडे, पाचशे ग्रॅम चांदीचे वाळे, दोनशे ग्रॅम चांदीचे लॉकेट असे एकूण १९ लाख ७६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

सीसीटीव्ही कॅमेरे फोडले
कारमधून उतरल्यानंतर चोरट्यांनी प्रथम दुकानाच्या आजू- बाजूला असलेले सीसीटीव्ही कॅमेरे फोडले आणि नंतर दुकानात प्रवेश केला. चोरी केल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआरही चोरून नेण्यात आला.


व्यापाऱ्यांचा बंद

सराफा दुकानातून जवळपास २० लाखांचे दागिने चोरीस गेले आहेत. ही माहिती मिळताच गावातील सराफा व्यापाऱ्यांनी आठवडी बाजार असतानाही दुपारपर्यंत दुकाने बंद ठेवून घटनेचा निषेध केला.

चोरटे सीसीटीव्हीत, तरी शोध लागेना
कुंभार पिंपळगाव येथे मागील सहा महिन्यांत आठ ते दहा ठिकाणी चोऱ्या झाल्या आहेत. अनेक ठिकाणी चोरटे सीसीटीव्हीत कैद झालेले आहेत. परंतु, अद्याप त्या चोऱ्यांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीकडे नागरिकही बोट करू लागले आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!