फळबागांसाठी 36 हजाराची तातडीने मदत करा-आ.राजेश टोपे
जालना जिल्हयातील अतिवृष्टी ग्रस्त भागाचे सरसकट पंचनामे करून जिरायतीसाठी 13 हजार,बागायतीसाठी 27 हजार व फळबागांसाठी 36 हजाराची तातडीने मदत करा-आ.राजेश टोपे कुंभार पिंपळगाव : दिनांक ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबरच्या दरम्यान वादळी वा-यासह मुसळधार पाऊस पडून जिल्हयातील सर्व महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे.या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतक-यांचे शेती व पिकांचे संपूर्णपणे नुकसान झाले असून अतिवृष्टी ग्रस्त भागाचे सरसकट पंचनामे करून जिरायतीसाठी 13 हजार,बागायतीसाठी 27 हजार व फळबागांसाठी 36 हजाराची तातडीने मदत करा असे माजी मंत्री आ.राजेश टोपे यांनी मागणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे यांना महाविकास आघाडीच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी केली.
शेती-खरीप व फळबागांचे नुकसान: मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस व अतिवृष्टी झाल्याने अनेक ठिकाणी जमीनी खरडून गेलेल्या आहेत. शेतामध्ये उभी असलेली कापूस, तूर, सोयाबीन, मुग उडीद या खरीप पिकांचे पूर्णणणे नुकसान झालेले आहे. तसेच पालेभाज्यासह मोसंबी, डाळिंब, द्राक्ष, पपई, आंबा, पेरु, केळी, चिकू, सिताफळ या फळबागांचे सुध्दा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. जमीनी खरडून जाणे अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे तसेच कांही ठिकाणी पाझर तलाव फुटल्याने जिल्हयामध्ये अनेक ठिकाणी शेतक-यांच्या जमीनी खरडून व वाहून गेलेल्या आहेत.
पिक विमा खरीप पिकांचे अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. खरीप पिक विमा हा स्थानिक नैसर्गीक आपत्ती (लोकॅलाईजड क्लॅमीटी) कॅर्टगिरीमध्ये येतो. यामध्ये विमा कंपनीला ७२ तासाच्या आतमध्ये कळवावे लागते. विमा कंपनीने दिलेला टोलफ्री क्रमांक १४४४७ व क्रॉप इन्शुरन्स अॅप व्दारे बंद असल्याने शेतकरी वर्गामध्ये तीव्र नाराजी आहे.कृषि विभागाने गंभीर दखल घेवून विमा धारकांना विमा रक्कम मिळवून द्यावी. फळबाग विमा : फळबाग विमा हा हवामान आधारीत आहे. अतिवृष्टी व सर्वदूर पाऊस झाल्याने मोठया प्रमाणावर फळगळ होऊन शेतक-यांचे मोठया प्रमाणावर फळबागांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे १०० टक्के विम्याचे पैसे शेतक-यांना मिळाले पाहिजे, याबाबत आपण तातडीने उचित कार्यवाही करावी. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान: अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे दळण-वळण पुर्णपणे ठप्प झालेले आहे.
यामुळे कांही गांवाचा संपर्क तुटला, शालेय विद्यार्थी, रुग्ण, वयोवृध्द नागरिक यांची मोठ्याप्रमाणावर गैरसोय झालेली आहे. त्यामुळे तात्काळ रस्ते व पुलांची दुरुस्ती करुन जनजीवन सुरळीत करावे. शाळा खोल्या, वॉल कंपाऊंड, स्मशानभूमी वॉलकंपाऊंडची मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली आह, ते सुध्दा तातडीने दुरुस्त करणे गरजेचे आहे. रस्ते व पुल दुरुस्तीसाठी प्रस्ताव तयार करुन FDR (Flood Damage Repair) मधून निधी मंजुर करुन तातडीने रस्ते व पुलांची दुरुस्ती करण्यात यावी. महावितरण: अनेक ठिकाणी ट्रान्सफार्मर, ११ केव्ही लाईन तसेच एलटी लाईन, पोल पडलेले असल्यामुळे त्या भागातील विज पुरवठा बंद आहे. त्यामुळे लोकांना शेतीची लाईट, गांवातील लाईट बंद झाल्याने गैरसोय निर्माण झाली आहे. तातडीने या सर्व गोष्टी दुरुस्त करुन विज पुरवठा पूर्ववत सुरळीत करण्यात यावा.
वैयक्तीक नुकसान: नवी व नाल्याच्या बाजूस असलेल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरुन घरोपयोगी वस्ती व अन्नधान्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. तसेच अनेक गांवात धरांची पडझड झालेली आहे. शासनाचे स्थायी आदेशाप्रमाणे अशा बाधीत कुटुंबाना तात्काळ मदत देण्यात यावी. तसेच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे असलेले पशुधन गाय, बैल, म्हैस, शेळी, कोंबड्या इत्यादी पशुधन पाण्यात वाहुन गेले व मृत्युमुखी पडलेले आहेत. तसेच घनसावंगी तालुक्यामध्ये बाणेगांव व रांजणी येथील दोन नागरिक पुराच्या पाण्यामध्ये बाहुन जाऊन मृत्युमुखी पडलेले आहे.
तातडीने याचे पंचनामे करून त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात यावी. बँककर्ज वसूली : शेतामधील खरीप पिकांचे पूर्णपणे नुकसान झाल्याने शेतकरी कर्ज भरु शकणार नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारे सक्तीची कर्ज वसुली न करता कर्जाचे पुनर्गठण करण्यात यावे. तसेच रब्बी पिकांसाठी नव्याने कर्ज देण्यात यावेत. संपूर्ण जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अस्मानी संकटाने हिरावून घेतलेला आहे.
शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून तो मोठ्घा आर्थिक विवंचनेत सापडला आहे. जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत व त्याअनुषंगाने विजबील वसूली, कर्ज वसूली करु नये, शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशा व या अनुषंगाने दुष्काळाच्या सर्व सवलती लागू करण्यात याव्यात. झालेल्या सर्व नूकसानीचे सरसकट पंचनामे तातडीने करण्यात यावेत. शासन निर्णयाप्रमाणे तात्काळ जिरायती पिकांसाठी हेक्टरी रु. १३०००/-, बागायतीसाठी हेक्टरी रु. २७०००/- व फळबागांसाठी हेक्टरी रु.३६०००/- नुकसान भरपाई देण्यात यावी असे महाविकास आघाडीच्या वतीने निवेदनात नमुद केले आहे.
यावेळी माजी आ.सुरेश जेथलीया,माजी आ.चंद्रकांत दानवे,माजी आ.संतोष सांबरे,मा.भास्करराव आंबेकर,मा.ए.जे.बोराडे,मा.संजय लाखे,मा.राजाभाऊ देशमुख,मा.डॉ.निसार देशमुख,मा.अनिरुध्द खोतकर,बबलु चौधरी,मा.सतिष टोपे,मा.कपिल आकात,सौ.सुरेखा लहाने,मा.ऍ़ड संजय काळबांडे,मा.मनोज मरकड,मा.सतिष होंडे,मा.कल्यान सपाटे,मा.नंदकिशोर जांगडे,मा.शेख महेमुद,मा.सुरेश खंडाळे,मा.राजेंद्र जाधव,मा.दिलीपराव भुतेकर,मा.भरत कदम,मा.राजेंद्र राख,मा.कैलास मगरे,मा.रामधन कळंबे,मा.राम सिरसाट,मा.अरुण पैठणे,मा.देवनाथ जाधव,मा.बाळासाहेब खंदारे,मा.ज्ञानेश्वर वायाळ,मा.धनंजय देशमुख,मा.एकबाल पाशा,शेख फारुख,मा.आमेर तांबोळी,मा.जयप्रकाश चव्हाण,सौ.मनकर्णा डांगे,मा.अशोक आघाव यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.