जालना क्राईममंठा तालुका

पोलीस निरीक्षक विलास निकम यांची थेट विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार

(अप्पर पोलीस अधीक्षक यांनाही सर्वपक्षीय शिष्टमंडळ भेटले ) मंठा /प्रतिनिधी : मंठा पोलीस स्टेशन हद्दीत मटका, जुगार, अवैध प्रवासी वाहतूक, चक्री मटका, गावागावात अवैध देशी विदेशी दारूची विक्री, पोलीस स्टेशन हद्दीत झालेले एका वर्षातील तीन खुणाच्या घटना, चोऱ्यामाऱ्या, अवैध वाळू वाहतूक यांना अभय देणारे मंठा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास निकम यांची तत्काळ बदली करावी या मागणीसाठी पत्रकारांसह सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आज मंगळवार ता. 16 रोजी थेट औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे कार्यालय गाठून लेखी निवेदन दिले. तत्पूर्वी जालना येथे अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या सोबत चर्चा करून तात्काळ कारवाईची मागणी केली. मंठा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास निकम यांची कारकीर्द वादग्रस्त ठरत असून त्यांनी पोलीस स्टेशन चा पदभार घेतल्यापासून मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे फोफावले आहेत वर्षभरात एकापाठोपाठ झालेल्या खुणाच्या घटनांनी सर्वसामान्य जनता भयभीत झाली आहे. तालुक्यात सुद्धा असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून शहरात व ग्रामीण भागात चोरीच्या घटना, अवैध देशी विदेशी दारूची गावागावात किराणा दुकानातून होणारी विक्री यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. मोबाईल मटका, ग्रामीण भागातील जुगार अड्डे अनेकांचे संसार उध्वस्त करीत आहेत. परभणी, बुलढाणा जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात जुगारी जुगार खेळण्यासाठी मंठा तालुक्यात येत असल्यामुळे मंठा जुगाराचा केंद्रबिंदू बनला आहे. ग्रामीण भागात अवैध पेट्रोल डिझेलची विक्री, तालुक्यातील वाळू घाटावरून या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे तसेच मंठा ते तळणी, मंठा ते सेलु, मंठा ते आंभोडा कदम, मंठा ते पाटोदा मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून अपघात झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पोलीस निरीक्षकांच्या सर्वच अवैद्य धंद्याकडे दुर्लक्ष दिसून येते. तालुक्यातील सर्वच अवैध धंदेवाल्या सोबत पोलीस निरीक्षक विलास निकम यांची ऊठबैस असल्यामुळे सामान्य नागरिक तक्रार करण्यास धजावत नाही. पोलीस निरीक्षक यांनी अवैध धंदे करणाऱ्यांकडून वसुली करण्यासाठी आपल्या मर्जीतील खास कर्मचारी व खाजगी व्यक्तींची नेमणूक केलेली आहे.अवैध धंद्याविरुध्द बातम्या देणाऱ्या पत्रकारांनाही अवैध धंदे करणारे धमकी देत असून त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. अवैध धंद्यांना खतपाणी घालणारे, अवैधधंदेवाल्या सोबत आर्थिक हितसंबंध जोपासणाऱ्या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास तात्काळ बदली करावी ,अशी मागणी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आज औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक तसेच पोलीस अधीक्षक जालना यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर मंठा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नीळकंठ वायाळ, पंचायत समितीचे माजी उपसभापती कल्याणराव खरात, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक बालासाहेब बोराडे, नगरसेवक अरुण वाघमारे, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश घुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बालासाहेब घनवट, धनगर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष बालासाहेब गायकवाड, माजी ग्रामपंचायत सदस्य रामप्रसाद कदम, नगरसेवक इल्यास कुरेशी, काँग्रेस कमिटीचे सचिव कबीरभाई तांबोळी, अनिस पाशु बागवान, खलील अन्सारी, ज्येष्ठ पत्रकार बाबासाहेब कुलकर्णी, एम.आय,एम.तालुकाध्यक्ष शेख एजाज उद्दीन, शहराध्यक्ष ताहेर बागवान, बसपाचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन मोरे, भाजपा दलित आघाडीचे मंठा तालुका अध्यक्ष रावसाहेब खरात, रमेश लक्ष्‍मण आवारे यांच्या सह्या आहेत.

images (60)
images (60)

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!