परतूर तालुका
नवे रेल्वेगेट सुरू ; वाहतूक कोंडी मात्र कायम
आता भुयारी मार्गाची प्रतीक्षा
न्यूज परतूर – शहरातील आष्टीकडे जाणाऱ्या मार्गावरील नव्या रेल्वेगेटचे अलीकडेच उद्घाटन करण्यात आले असून नव्या गेटमधून वाहतूक सुरु झाली आहे. दरम्यान, आता याच ठिकाणच्या भुयारी मार्गाचे काम लवकर व्हावे अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.
शहरातील रेल्वे क्रॉसिंग गेटजवळील उड्डाणपुलाचे काम मागील काही वर्षांपासून सुरू आहे.मध्यंतरी हे काम अनेक महिने रेंगाळले होते.संबंधित कामाच्या कंत्राटदाराने योग्य पर्यायी रस्ता देखील करून दिला नव्हता.परिणामी वाहनचालक व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.मात्र मागील काही महिन्यांपासून उड्डाणपुलाच्या कामाला गती मिळाल्याचे चित्र दिसत आहे. लोहमार्गावरील नवे रेल्वेगेट वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहे.मात्र उड्डाणपुलाचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने वाहतुक कोंडीचा त्रास मात्र अद्याप कायम आहे.
भुयारी मार्गाचे काम लवकर व्हावे
नवे रेल्वेगेट वाहतुकीसाठी खुले झाले असले तरी रेल्वे येण्याच्या काही मिनिटे अगोदर रेल्वेगेट बंद करावे लागते.त्यामुळे या ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीचा त्रास मात्र अद्याप कायम आहे.त्यामुळे भुयारी मार्गाच्या कामाला गती देऊन भुयारी मार्ग लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याची गरज आहे.
रेल्वेगेट परिसरात अतिक्रमणे वाढली आहेत.त्यामुळे वाहतुकी ला मोठा अडथळा निर्माण होतो.या ठिकाणी तसेच शहराच्या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याची गरज आहे.