जवान गोपाल कांबळे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
उपस्थितांनी साश्रुनयनांनी दिला अखेरचा निरोप
मधुकर सहाणे/भोकरदन प्रतिनिधी
जालना, दि. 9 :- भोकरदन तालुक्यातील बाभुळगाव येथील रहिवाशी असलेले जवान गोपाल मधुकर कांबळे यांचे दिल्ली येथील सैनिकी रुग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर दि. 9 एप्रिल रोजी भोकरदन तालुक्यातील बाभुळगाव येथे शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बाभुळगाव येथील ग्रामस्थ व उपस्थितांनी साश्रुनयनांनी गोपाल कांबळे यांना अखेरचा निरोप दिला.
शहीद जवान गोपाल कांबळे यांच्या पार्थिवाला त्यांचा मोठा भाऊ जवान सतीश कांबळे यांनी मुखाग्नी दिला.
यावेळी आमदार संतोष दानवे, श्रीराम सोनुने, कुंडलिक मुठ्ठे बबनराव शिंदे दिनकर थोटे, साहेबराव दळवी,वामनराव जंजाळ, मनिषा जंजाळ,केशव जंजाळ, विनोद गावंडे,तहसीलदार संतोष गोरड,नायब तहसीलदार काशिनाथ तांगडे,पोलीस निरीक्षक श्रीमती नाईक, पोलीस उपनिरीक्षक नितीन काकरवाल, बी. एन.कड,सुदामराव देठे, हभप.संतोष महाराज आढवने,माणिक दानवे,केशव जंजाळ, सुनिल महाराज गाडेकर आदींनीही त्यांना पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी गावातून निघालेल्या अंत्ययात्रेत देशभक्तीपर गीते वाजवली जात होती. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘अमर रहे… अमर रहे… शहीद जवान अमर रहे’, या घोषणांनी संपुर्ण आसमंत निनादुन गेला. शदीद जवान गोपाल कांबळे यांच्या राहत्या घरापासून संपुर्ण बाभुळगावातुन मिरवणुक काढण्यात येवुन त्यांचे पार्थिव आंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. लष्कराच्या सजवलेल्या वाहनातून ही मिरवणूक निघाली. मिरवणुकीत लष्कराचे अधिकारी, जवान, स्थानिक महसूल व पोलीस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. गावात ठिकठिकाणी गोपाल कांबळे यांना आदरांजली अर्पण करणारे बॅनर लागले होते. अत्यंविधिवेळी तालुक्यातील राजकीय, सामाजीक, शैक्षणिक, कृषी, सैन्यदल, महसुल, पोलीस यासह विविध क्षेञातील अनेक मान्यवर उपस्थीत होते.