जालन्यात डोक्याला पिस्तूल लावून हातपाय बांधून जंगलात फेकून देत सळयांसह ट्रक लाबविला
भोकरदन प्रतिनिधी :
दरोडेखोरांनी एका चालकाच्या डोक्याला पिस्तूल लावून हातपाय बांधून जंगलात फेकून देत सळयांसह ट्रक चोरून नेला. ही घटना मंगळवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास राजूर (ता.भोकरदन) शिवारात घडली असून, या प्रकरणी चौघांविरूद्ध हसनाबाद पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलीम बिस्मल्ला पिंजारी (रा. गरीबनवाज कॉलनी, दौंडाईचा ता. सिंदखेडा, जि.धुळे) हे गेल्या दहा वर्षापासून धुळे ते जालना दरम्यान भंगार वाहतुकीचा (ट्रक क्रमांक एम.एच.१८- एम.३१११) मधून व्यवसाय करतात. मंगळवारी दुपारी जालन्याला कंपनीत भंगार खाली केल्यानंतर श्रीओम कंपनीतून रात्री ११ वाजता साडे अकरा टन सळई ट्रकमधे भरून नंदुरबारकडे निघाले होते. जालन्याहून येत असतांना राजूर जवळील जानकी हॉटेल जवळ राजूरकडून एक पांढऱ्या रंगाची चारचाकी कार ट्रकच्या समोर येवून लावण्यात आली. ट्रक थांबवल्यानंतर पाच अज्ञात आरोपींनी खाली उतरत कॅबीनमध्ये घुसून चालकाला लोखंडी सळईने डोक्यात मारून जखमी केले. खिशातील मोबाईल व पैसे काढून घेत हातपाय बांधून चारचाकी वाहनाच्या डिक्कीत कोंबले.यात एका जणाच्या हातात पिस्तूल तर दुसऱ्या जवळ सुरी होती. चालकाला धमकी देत हातपाय बांधून बदनापूर शिवाराच्या हद्दीतील जंगलात सोडून ट्रक घेवून पसार झाले. चालकाने स्वत:ची सुटका करून घेत दवाखान्यात उपचार घेवून राजूर पोलिस चौकी गाठली. चालकाच्या तक्रारी वरून हसनाबाद ठाण्यात अज्ञात चार जणाविरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी इंदलसिंग बहूरे, सपोनि.वैशाली पवार, जमादार प्रदीप सरडे, नरहरी खार्डे, स्थागुन्हे शाखेचे जगदीश बावणे, किशोर पुंगळे, योगेश सहाने यांनी भेट दिली.