जायकवाडीच्या पाण्यासाठी हजारो शेतकऱ्यांच्या कृषी वीजेला ब्रेक! अंबड, घनसावंगी, परतूरमध्ये ७ दिवस पूर्ण वीजबंदी; नंतर रोज फक्त ४ तास वीज

कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय; ३० ते ११८ किलोमीटर परिसरातील गावांवर परिणाम
जालना | प्रतिनिधी
जायकवाडी धरणातून सोडलेले सिंचनाचे पाणी कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचावे, यासाठी प्रशासनाने आता थेट कृषी वीजपुरवठ्यावर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे अंबड, घनसावंगी आणि परतूर तालुक्यांतील कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा बदल सहन करावा लागणार आहे. २५ नोव्हेंबरपासून १ डिसेंबर २०२६ पर्यंत सलग सात दिवस कृषी वीजपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यानंतरही आवर्तन संपेपर्यंत दररोज केवळ चार तासच वीज मिळणार आहे.
जायकवाडीच्या डाव्या कालव्याच्या शेवटच्या टप्प्यातील शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी मिळावे आणि वाटेतच अनधिकृतपणे पाण्याचा उपसा होऊ नये, यासाठी प्रशासनाने हा कठोर निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाचा परिणाम कालवा लाभक्षेत्रातील शेतीच्या कामांवर होणार असल्याने संबंधित गावांतील शेतकऱ्यांचे लक्ष आता पाणी आवर्तन आणि वीजपुरवठ्याच्या वेळापत्रकाकडे लागले आहे.
सात दिवस वीज पूर्ण बंद; त्यानंतर फक्त चार तास पुरवठा
निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत हदगल यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत हे आदेश जारी केले आहेत.
आदेशानुसार, २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२६ या सात दिवसांच्या कालावधीत संबंधित लाभक्षेत्रातील कृषी वीजपुरवठा १०० टक्के बंद राहणार आहे. त्यानंतर सिंचनाचे चालू आवर्तन पूर्ण होईपर्यंत दररोज सकाळी ६ ते १० या वेळेतच कृषी वीजपुरवठा सुरू राहील. म्हणजेच उर्वरित २० तास भारनियमन लागू असेल.
घनसावंगी तालुक्यातील कोणत्या गावांना फटका?
या निर्णयाचा परिणाम घनसावंगी तालुक्यातील जायकवाडी मुख्य डावा कालवा आणि वितरण व्यवस्थेच्या परिसरातील कृषी विद्युत पंपांवर होणार आहे.
घनसावंगी तालुक्यातील खा. हिवरा, बाचेगाव, भायगव्हाण, दहिगव्हाण, तीर्थपुरी, खालापुरी, मांदळा, बोडखा, खडका, खडकावाडी, लिंबोनी, सिंदखेड, पिंपरखेड, आरगडे गव्हाण, पाडोळी, कुंभार पिंपळगाव, मूर्ती, लिंबी, भेंडाळा, घानेगाव, कोटाळा, विरेगव्हाण आणि जांबसमर्थ या गावांचा समावेश आहे.
अंबड आणि परतूर तालुक्यातील गावांचाही समावेश
अंबड तालुका : भांबरी, दह्याळा, चंदनापुरी खुर्द, चंदनापुरी बुद्रुक, रेणापुरी, चुर्मापुरी, पिंपळगाव सिरसगाव, शहापूर, दाढेगाव, धाकलगाव, सौंदलगाव, रामगव्हाण, नालेवाडी, डोणगाव, दोदडगाव, अंतरवाली सराटी, टाका, वडीगोद्री, करंजळा, वडिकाळ्या, घुंगडे हादगाव, भणंग जळगाव, भार्डी, रुई, सुखापुरी, बेलगाव आणि एकलेहरा.
परतूर तालुका : वाहेगाव, आंतरवाला, सातारा, आसनगाव, हादगाव, बाणाची वाडी, ढोणवाडी, वडारवाडी, पळशी, धामणगाव, ठोकमाळ, कनकवाडी, लोणी, आष्टी, रायगव्हाण, आनंदगाव, ब्राह्मणवाडी आणि फुलवाडी.
अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी पोलीस बंदोबस्त
कालव्यातून पाण्याचा अनधिकृत उपसा होऊ नये, यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांना आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कालवा परिसरात आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत.
पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी महावितरण आणि पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी धडक उपाययोजना कराव्यात, असेही आदेशात नमूद आहे.
आदेश मोडल्यास काय कारवाई होणार?
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ५१ ते ५८ अन्वये कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जायकवाडीच्या डाव्या कालव्याचे पाणी शेवटच्या टप्प्यातील शेतकऱ्यांपर्यंत प्रत्यक्षात किती प्रभावीपणे पोहोचते? पाण्याचे समन्यायी वितरण करण्यासाठी घेतलेल्या या निर्णयामुळे कालव्याच्या सुरुवातीच्या भागातील अनधिकृत उपसा कितपत रोखला जातो आणि शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांना किती दिलासा मिळतो, याकडे अंबड, घनसावंगी आणि परतूर तालुक्यांतील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
— जिल्हा माहिती कार्यालय, जालना यांच्या प्रसिद्धीपत्रकावर आधारित