माहोरात लॉकडाऊनच्या काळात कृषी केंद्राकडुन चढया दराने विक्री
खताच्या गोणी मागे अव्वाच्या सव्वा दर;कारवाईची मागणी
माहोरा : रामेश्वर शेळके
माहोरा येथील कृषी केंद्र चालकांकडून खताची व बियाणेची चढ्या भावाने विक्री सुरू आहे. यात शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात आहे. याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष होत आहे. कृषी केंद्र चालक मनमानीने किंमती आकारून खत, बियाण्यांची विक्री करीत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशाला मात्र चुना लागत आहे.
माहोरा येथील काही नामांकित कृषी केंद्र चालकांनी रासायनिक खताच्या गोदामामध्ये अवैध साठा करून ठेवला आहे. खत उपलब्ध असूनसुद्धा खताचा तुटवडा दाखविला जात आहे. खते उपलब्ध नाही, असे सांगून शेतकऱ्यांकडून १०० रूपये चढ्या भावाने आकारून खताची विक्री सुरू केली आहे. काही कृषी दुकानदारांचे कृषी अधिकऱ्यांसोबत ‘मधुर‘ संबंध असल्याची चर्चा आहे.
ज्या बियाण्यांना कृषी केंद्रात विक्री करायची परवानगी नाही, असेही बियाणे दुकानदारांकडून विक्री केले जात असल्याचा संशय आहे. अनेक कृषी केंद्रांमध्ये दर फलक, स्टॉकबुकही उपलब्ध नसते. अनेक शेतकरी उधारीवर बियाणे, खते घेत असल्याने त्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत चढ्या दराने बियाणे, खते विकत घ्यावे लागत आहे.