सारथी ची चौकशी कधी पूर्ण होणार,दिड वर्ष उलटूनही चौकशी अपूर्ण महत्त्वपूर्ण तारादूत प्रकल्प रखडला
दिड वर्ष उलटूनही चौकशी अपूर्ण महत्त्वपूर्ण तारादूत प्रकल्प रखडला
मधुकर सहाने : भोकरदन
मराठा समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी असलेली छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी केवळ नावालाच सुरु आहे.सारथी मध्ये समाजासाठी ना योजना ना प्रकल्प सुरु आहे.
सारथीच्या प्रत्येक योजना ग्रामीण भागातल्या लोकांपर्यंत,विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी, मराठा-कुणबी घटकांचे सर्वेक्षण करण्यासाठी तसेच मराठा समाज मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून असल्या कारणामुळे मराठा समाजाला कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी तारादूत प्रकल्प सुरू होता परंतु केवळ तीन महिने प्रकल्प चालून या प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली. चौकशीच्या नावाखाली स्थगिती देण्यात आली आज दीड वर्ष पूर्ण होऊनही ती चौकशी पूर्ण झाली नाही.
एकीकडे सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केले आणि दुसरीकडे शासन आणि अधिकारी यांच्या केवळ वेळकाढूपणा मुळे तारादूत सारखे महत्त्वपूर्ण प्रकल्प आज रखडलेले आहे. मराठा समाजाचा सामाजिक आणि शैक्षणिक विकास होणार कसा हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
सारथी चा आत्मा हा तारादूत प्रकल्प आहे परंतु तो प्रकल्प जर का सुरू नाही झाला तर सारथीच्या या योजना ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांपर्यंत लोकांपर्यंत कशा पोहोचतील हा मोठा प्रश्न आहे मागील वर्षी सारथीमध्ये 130 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला परंतु त्यापैकी केवळ 34 कोटी निधी खर्च झाला आहे.
पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण आणि कौशल्य विकास ही योजना सारथीने राबवली परंतु ग्रामीण भागापर्यंत योजना पोहोचवणारी यंत्रणा नसल्यामुळे पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाला केवळ 6615 अर्ज आले या दोन्ही योजनेला वेळोवेळी मुदतवाढ देण्यात येत आहे सारथीच्या या कारभारामुळे मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणावर मराठा समाज आहे परंतु या समाजासाठी चालणाऱ्या सारथी मध्ये केवळ तीनच कर्मचारी आहे या तीन कर्मचाऱ्यावर सारथी चालणार कशी?
ज्या हेतूने सारथी ची स्थापना करण्यात आली होती तो हेतू सारथीच्या माध्यमातून साध्य होताना दिसत नाही सारथी छत्रपती शाहू महाराज यांचा जीवंत स्मारक आहे त्याप्रमाणे सारथी मध्ये विविध योजना विविध प्रकल्प सुरू झाले पाहिजेत आणि सारथीच्या योजना ग्रामीण भागातल्या लोकांपर्यंत,विद्यार्थ्यांपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत सारथीचा महत्त्वपूर्ण असलेला तारादूत प्रकल्प सुरू झाला पाहिजेत याबाबत मागणी समाजाकडून होत आहे.