भोकरदन तालुक्यातील गोद्री येथील स्वस्त-धान्य दुकानदारांची चौकशी
62 क्विंटल माल स्वस्त -धान्य गायब असल्याचे मंडळअधिकारी,तलाठी यांच्या प्रत्यक्ष चौकशीत समोर आले.
प्रतिनिधी भोकरदन
भोकरदन तालुक्यातील गोद्री गावात स्वस्त धान्य दुकानदार हे मागील एक वर्षापासून गावात माल वाटपात मोठ्या प्रमाणात काळाबाजार करत आहेत.व दोन-दोन महिने माल वाटप करत नाहीत व माल वाटप करताना मालाची पावती सुद्धा शिधापत्रिकाधारकांना देत नाहीत व माल चढ्या भावाने देतात,व माल सुद्धा कमी देत असल्यामुळे गावातील काही नागरिकांनी तहसीलदार आणि पुरवठा अधिकारी भोकरदन यांना लेखी तक्रार दिली होती आणि तक्रारीची एक प्रत माननीय जिल्हाधिकारी जालना यांना सुद्धा दिली होती.
दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटले होते की सदर दुकानदार मोठ्या प्रमाणात काळाबाजार करत असल्यामुळे तहसीलदार आणि पुरवठा अधिकारी यांना निवेदन देऊन दोन महिने झाले तरी सदर तक्रारीची कोणतीही दखल पुरवठा अधिकारी विभागाने घेतली नव्हती.
त्यामुळे लोकसत्ता युवा संघटनेचे ता.अध्यक्ष जावेद पठाण व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्य यांनी जिल्हाधिकारी यांना भेटून लेखी तक्रार दिली होती. त्यामुळे संबंधित तहसीलदार आणि पुरवठा अधिकारी यांची झोप उडाली आणि त्यांनी लगेच गोद्री गावात मंडळ अधिकारी गारोळे,आणि तलाठी जाधव यांना तात्काळ पाठवून चौकशी करून आणि पंचनामा केला.
चौकशी केलेल्या प्रमाणे सदर दुकानदार यांचे ई-पास मशीन चेक करण्यात आले.मशीन मध्ये 74 क्विंटल माल शिल्लक असल्याची पावती मशीन मधून काढली.आणि प्रत्यक्ष स्वस्त-धान्य दुकानात मालाची चौकशी केली असता त्यामध्ये फक्त 12 क्विंटल मात्र प्रत्यक्षात दुकानात आढळून आला असल्यामुळे सदर धान्य दुकानात जवळपास 62 क्विंटल माल स्वस्त-धान्य गायब म्हणजेच काळ्याबाजारात विक्री झाल्याचे संबंधित मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्या निदर्शनात आले आहेत. मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी गावातील प्रतिष्ठित नागरिक व गावकऱ्यांच्या समोर पंचनामा करून पंच लोकांच्या सह्या सुद्धा पंचनामा वर घेतल्या आहेत.
सदर स्वस्त-धान्य दुकानदाराने मोठ्या प्रमाणात काळाबाजार केला असल्यामुळे आता सदर दुकानदाराची तहसीलदार, पुरवठा अधिकारी कारवाई करतात किंवा आशीर्वाद देतात याकडे सर्व गावकऱ्यांचे लक्ष लागले आहेत.
प्रतिक्रिया : स्वस्त धान्य दुकानदार यांनी माझ्याकडून नवीन शिधापत्रिका आणून देतो म्हणून एक हजार रुपये घेतले एक वर्ष झाले तरी आज पर्यंत कार्ड आणून दिले नाहीत.
सौ.सुलाबाई रामराव सुरडकर
शिधापत्रिका धारक
प्रतिक्रिया : स्वस्त धान्य दुकानदार यांनी गावातील काही केशरी शिधापत्रिकाधारकांना सांगितले की मी तुम्हाला बीपीएल (पिवळी) शिधापत्रिका आणून देतो म्हणून दोन-दोन हजार रुपये घेतले परंतु लोकांना आज पर्यंत कार्ड मात्र मिळाले नाहीत.
असमाबी रईसखा पठाण
सरपंच ग्रामपंचायत गोद्री
प्रतिक्रिया : गोद्री येथील स्वस्त धान्य दुकानदार यांचा पंचनामा मंडळाधिकारी गारोळे, तलाठी जाधव, यांच्याकडून मला मिळाला असून मी अहवाल तयार करून तहसीलदार साहेब यांच्याकडे देणार आणि पुढील कारवाई तहसीलदार साहेब स्वस्त-धान्य दुकानदर यांना बोलावतील मशीन चेक करून पुढील कारवाई करतील.
बालाजी पापुलवाड
नायब तहसीलदार पुरवठा भोकरदन.