पक्ष बाजुला ठेऊन समाजासाठी एकत्र या! …. छत्रपती संभाजीराजे भोसले
घनसावंगीत संभाजीराजेंचा मराठा आरक्षण जनसंवाद दौरा
घनसावंगी प्रतिनिधी / नितीन राजे तौर
घनसावंगी तालुक्यात मराठा आरक्षण चळवळ निमित्त कोल्हापूर चे छत्रपती संभाजी महाराज हे मराठा जनसंवाद दौऱ्यानिमित्ताने घनसावंगी तालुक्यात आले असता समाजबांधवांना संबोधित करतांना छत्रपती संभाजीराजे म्हणाले की,केंद्राकडून वटहुकूम काढून कायदा करावा यासाठी ”सर्वांनी पक्ष बाजूला ठेऊन एकत्र या” आपला आवाज केंद्रापर्यंत पोहोचला पाहिजे आणि यासाठी मी नेतृत्व नाही पुढाकार घेत असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना केले.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे आता मोठी कसोटी आहे. सर्वांनी पक्षविरहित एकत्र येऊन केंद्रापर्यंत आवाज पोहोचवावा लागेल. आपण यासाठी नेतृत्व नाही तर पुढाकार घेणार असल्याचे छत्रपती खासदार संभाजीराजे म्हणाले.छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत मराठा क्रांती मोर्चाच्या पुढाकाराने 3जुलै रोजी घनसावंगी येथे मराठा आरक्षण जनसंवाद कार्यक्रम झाला. यावेळी छत्रपती संभाजीराजे म्हणाले, समाजाला रस्त्यावर आणू नका, त्यांना वेठीस धरू नका. तुम्ही समाजासाठी काय करणार ते सांगा. आता केवळ राज्यपालांना पत्र देऊन उपयोग नसून मागासवर्ग आयोगाकडून समाजाचे फेरसर्व्हेक्षण करून समाजाचा मागासवर्ग प्रवर्गात समावेशाच्या शिफारशीचा अभ्यासपूर्ण अहवाल सादर करणे गरजेचे आहे. केंद्राने वटहुकूम काढून घटनेत दुरुस्ती करावी. यासाठी सर्व खासदारांना एकत्र करून आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहोत. यासाठी सर्वांनी पक्षभेद विसरून एकत्र यावे. आपण नेतृत्व नाही तर पुढाकार घेत असल्याचेही छत्रपती संभाजीराजे यांनी नमूद केले. आरक्षणातून जे समाजाला मिळणार आहे तितकेच ‘सारथी’च्या माध्यमातून मिळणार आहे. तरुणांनीही केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाच्या घोषणा आणि माझ्यासोबत फोटो काढण्यापेक्षा ‘सारथी’च्या योजनांचा अभ्यास करावा, असे आवाहनही खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी केले. सारथीला सहाशे कोटी रुपये मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.