भोकरदन पोलीस ठाण्यातील गटबाजी प्रकरणावरून पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षकाची उचलबांगडी
सपोनि. रत्नदीप जोगदंड भोकरदन ठाण्यात रुजू
मधुकर सहाने : भोकरदन
भोकरदन तालुक्यातील वालसा येथिल पूर्णा नदीच्या पात्रात वाळू चोरी करताना पकडलेले पाच ट्रॅक्टर आठ जुलै रोजी भोकरदन पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शालीनी नाईक आणि पोलीस कर्मचारी सवडे यांनी कारवाई न करता सोडावे, अशी मागणी केली होती, अशी तक्रार पोलीस उपनिरीक्षक अर्जुन पवार यांनी केली होती. यासंदर्भात दाखल झालेल्या फिर्यादीतदेखील या घटनेचा संदर्भ देण्यात आला होता.
या प्रकरणात आरोपीविरुद्ध चार दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलीस प्रशासनात खळबळ उडाली होती. या प्रकरणाची दखल घेत पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी भोकरदनच्या पोलीस निरीक्षक शालीनी नाईक आणि पोलीस उपनिरीक्षक अर्जुन पवार यांची तडकाफडकी पोलीस नियंत्रण कक्षात बदली केली आहे.
पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप जोगदंड यांनी आज सायंकाळी भोकरदन पोलीस ठाण्यात जाऊन पदभार स्वीकारला आहे.