राजुर येथील लिक्विड ऑक्सिजन व पीएसए प्लँटच्या कामाची जिल्हाधिकारी यांच्याकडून पाहणी
राजूर/दत्ता डवले
जालना, दि. 30 – राजुर येथे उभारण्यात येत असलेल्या लिक्विड ऑक्सिजन तसेच पीएसए प्लँटला जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी आज दि. 30 जुलै रोजी प्रत्यक्ष भेट देऊन या प्लँटच्या कामाची पहाणी करत येत्या सात दिवसांमध्ये या दोनही प्लँटची कामे पुर्ण करण्याचे निर्देश देऊन कोरोनावरील लस ही अत्यंत सुरक्षित असुन प्रत्येकाने ही लस टोचुन घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी तहसिलदार संतोष गोरड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत वाडेकर, डॉ.राजू राठोड, डॉ. संदीप घोरपडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चंदेल, नायब तहसिलदार श्री धर्माधिकारी आदींची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले, आजघडीला कोरोना रुग्णांची संख्या कमी असली तरी कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असणे गरजेचे आहे. राजुर येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोनावरील उपचार घेणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासु नये यादृष्टीने उभारण्यात येत असलेल्या लिक्विड ऑक्सिजन व पीएसए प्लँटचे काम येत्या सात दिवसांमध्ये पुर्ण करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.
लसीकरण केंद्राला भेट
राजुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुरु करण्यात आलेल्या कोरोना लसीकरण केंद्रालाही जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन लस घेणाऱ्या सर्वसामान्यांशी संवाद साधत घरामध्ये अजुन कोणी लस घेण्याचे बाकी आहे काय. जर लस घेण्यापासुन कोणी राहिले असेल तर तातडीने लस घ्या. लस ही अत्यंत सुरक्षित असुन प्रत्येकाने ही लस टोचुन घेण्याचे आवाहन करत लसीकरण केंद्रात नागरिकांना अधिक वेळ थांबावे लागू नये यादृष्टीने लसीकरण केंद्राच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात येऊन दोन टीम तयार करत लसीकरण गतीने पुर्ण करण्याचे निर्देशही आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी यावेळी दिले.
मास्क, सॅनिटायजर व सामाजिक अंतराचे पालन करा
प्रत्येकाने मास्क, सॅनिटायजरचा वापर करण्याबरोबरच सामाजिक अंतराचे पालन करण्याची गरज असुन प्रशासनामार्फत वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुचनांचे प्रत्येकाने तंतोतंत पालन करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी यावेळी केले.
राजुर येथील मंदिर परिसरात करण्यात येत असलेल्या विकास कामांचा आढावा
राजुर येथील गणपती मंदिरासही जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी भेट देत या ठिकाणी करण्यात येत असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. यामध्ये अंडरग्राऊंड दर्शन रांग, गाळ्यांची उभारणी या कामांची माहिती घेत सभामंडपाच्या कामाची पहाणी करुन कामे गतीने पुर्ण करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.