घनसावंगी तालुका

रांजणीची तहान भागविण्यासाठी ग्रामपंचायतचे शर्थीचे प्रयत्न

रांजणीची तहान भागविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
रांजणी प्रतिनिधी/असलम कुरेशी
घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून जनतेला खाजगी टँकरचे पाणी विकत घेऊन तहान भागविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे रांजणी ग्रामपंचायतचे पदाधिकारी गावाचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे.
रांजणी गावाची लोकसंख्या 13 ते 14 हजाराच्या जवळपास आहे. या गावाला येवला, चित्रवडगाव व देवळी तांडा येथील विहिरीतून पाणीपुरवठा करण्यात येत होता. परंतु येवला व चित्रवडगाव येथील विहिरींनी तळ गाठला आहे. तसेच देवळी तांडा येथील विहिरीवर फक्त दोन तास विद्युत पंप चालतो. इतक्या पाण्यावर रांजणीला पाणीपुरवठा करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे यशवंत सहकारी सुतगिरणीचे चेअरमन आबासाहेब वरखडे, रांजणीचे सरपंच राधाकिसन जाधव, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक अमोल देशमुख व पंचायत समिती सदस्य शेख रहिम यांनी रांजणीला कवठा येथील विहिरीतून पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु या विहिरीलाही मुबलक प्रमाणात पाणी नसल्याने सुंदरराव देवकर यांची विहिर अधिग्रहण करुन या विहिरीचा गाळ काढून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी या विहिरीचा गाळ काढण्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी सरपंच राधाकिसन जाधव, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक अमोल देशमुख, पंचायत समिती सदस्य शेख रहिम, नितीन वरखडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक