बठाण खुर्द शिवारातील नुकसानीचे पंचनामे सुरु
अंबड/प्रतिनिधी
तालुक्यातील बठाण खुर्द परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून मोठ्याप्रमाणात पिकांचे नुकसान झाले असून, महसूल विभागाच्यावतीने रविवारी या भागातील पीक नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहे.
बठाण खुर्द शिवारात मागील आठवड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली आहेत. यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून कापशी, तूर, सोयाबीन, मका, मूग, उडीद यासह मोसंबी, ऊस ही पिके उद्ध्वस्त झाली आहे. या नुकसानीमुळे शेतकरी राजा हतबल झाला आहे. दरम्यान, शासनाच्या निर्देशानुसार रविवारी तलाठी सी. टी. खिल्लारे, कृषी सहायक एम. बी. पाटील यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात जावून पीक नुकसानीचा आढावा घेवून पंचनामे केले आहे.
यावेळी शेतकरी जालिंधर वीर, भगवान मुळे, भुजंग केंधळे, सुरेश वीर, सतीश काकडे आदींची उपस्थिती होती. शासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे केल्यानंतर तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.