मराठा, ओबीसी आंदोलक आमने-सामने आल्याने तणाव
मराठा, ओबीसी आंदोलक आमने-सामने आल्याने तणाव
: वडीगोद्री येथे ओबीसींचे
उपोषण सुरू असून, येथूनच अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षण उपोषणस्थळी रस्ता जातो. वडीगोद्री येथील उपोषणस्थळ परिसरात गत दोन दिवसांपासून मराठा, ओबीसी आंदोलक एकत्र येत घोषणाबाजी करीत आहेत. यामुळे शनिवारी २१ सप्टेंबर रोजी दुपारी मोठा तणाव निर्माण झाला होता. अंतरवालीचा रस्ता बंद असल्याने संतप्त मराठा आंदोलकांनी सोलापूर-धुळे महामार्गावर अर्धा तास ठिय्या मांडला. दरम्यान, जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी आज बीडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.आंदोलक आमनेसामने आले व जोरदार घोषणाबाजी झाली. त्यातच अंतरवाली सराटीकडे जाणारा रस्ता बंद केल्यानंतर मराठा बांधवांनी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर येऊन घोषणाबाजी करीत ठिय्या मांडला.
पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर आंदोलक बाजूला झाले. पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी मराठा व ओबीसी आंदोलनातील समन्वयकांची बैठक घेतली.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती शुक्रवारी चांगलीच ढासळली होती.या पार्श्वभूमीवर मंत्री दीपक केसरकर, शंभुराज देसाई यांनी जरांगे पाटील यांच्याशी मोबाइलवर संवाद साधला.एक-दोन दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे रात्रीच्या सुमारास जरांगे पाटील यांनी सलाइन लावून घेत उपचार घेतले.
पोलिसांचा बंदोबस्त
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून एसआरपीएफची एक कंपनी, दंगा नियंत्रण पथक, स्ट्रायकिंग फोर्सची एक कंपनी, १२ अधिकारी, १० वाहतूक पोलिस कर्मचारी आणि ४० पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
कायद्याच्या महाराष्ट्रात दहशत निर्माण करण्याचा कोणी जर प्रयत्न करत असेल तर त्याला आम्ही घाबरणार नाही. जरांगेंचे दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जरांगेंनी लोकशाही मार्गाने आंदोलन करावे, अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल. -लक्ष्मण हाके, ओबीसी आंदोलक