उद्या जालना जिल्ह्यासह महाराष्ट्र बंदची यांनी दिली हाक
(आज दिनांक १० ऑक्टोबर २०२१)
जालना – उत्तर प्रदेश लखीमपूर येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या पुत्राने निष्पाप शेतकऱ्यांना चिरडल्याची दुर्दैवी घटना झाल्यानंतरही भाजपाच्या केंद्र सरकारने आरोपींना अटक केली नाही. या घटनेचा निषेध करण्यासाठी दि. 11 ऑक्टोबर सोमवार रोजी महाविकास आघाडीतर्फे जालना जिल्हा बंद पुकारण्यात आला असून यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना रस्त्यावर उतरणार असल्याचे पालकमंत्री राजेश टोपे, आ. कैलास गोरंट्याल, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, माजी आ. अरविंदराव चव्हाण, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख यांनी शनिवार रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत जाहीर केले आहे.
उत्तर प्रदेश लखीमपूर येथे निष्पाप शेतकऱ्यांवर जीप चालवून त्यांना चिरडण्यात आले असून यामध्ये सात शेतकऱ्यांचा बळी गेला असून एका पत्रकाराचा देखील मृत्यू झालेला आहे. अशी भयानक दुर्दैवी घटना घडल्यानंतरही उत्तर प्रदेश योगी सरकार आरोपींना पाठीशी घालत आहे. देशातील शेतकऱ्यांविरूध्द ही अमानवी घटना पाहिल्यानंतर सामान्य माणसाच्या अंगावर शहारे आल्याशिवाय रहात नाही. परंतू योगी आणि मोदी सरकार या घटनेकडे गांभीर्याने बघत नसल्यामुळे लोकशाही धोक्यात आलेली आहे.
असे एकुण चित्र देशामध्ये निर्माण झालेले आहे. राज्यातील महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. सोमवार रोजी जालना जिल्ह्यातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाणे बंद करावे असे आवाहन करण्यात आले आहे. शनिवार रोजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांच्या निवास्थानी झालेल्या जालना बंद संदर्भातच्या बैठकीत जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, बाळासाहेब वाकुळणीकर, सुधाकर निकाळजे, शेख महेमूद, नंदकिशोर जांगडे, विष्णू पाचफुले, आत्मानंद भक्त, बाला परदेशी, डॉ. विशाल धानुरे, राजेंद्र जाधव, सुरेश खंडागळे, तय्यब देशमुख, चंद्रकांत रत्नपारखे, नंदाताई पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते. आज सोमवार रोजी सकाळी 9 वाजता महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने मामा चौक येथे उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.