जनतेला विविध योजनांचा लाभ मिळाला पाहिजे – राजेश टोपे
परतूरला दीपावली स्नेहमीलन
कार्यक्रम संपन्न
दिपक हिवाळे /परतूर न्युज नेटवर्क
राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी करावे,कुठल्याही परिस्थितीत जनतेला विविध योजनांचा लाभ मिळालाच पाहिजे असे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सभापती कपिल आकात यांनी शनिवारी ( दि.१३) शहरातील वरदविनायक मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या दीपावली स्नेहमीलन कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते बबनराव लोणीकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.तर याप्रसंगी जिल्हाध्यक्ष डॉ.निसार देशमुख,रमेश सोळंके,आसाराम लाटे,राजेंद्र जाधव,माजी नगराध्यक्ष विनायक काळे,खय्युम खान पठाण,बळीराम कडपे,सय्यद आरेफ अली,विजय राखे,अंकुश तेलगड,अखिल काजी,गोपाळ बोराडे,भाऊसाहेब गोरे,बबनराव गणगे इतरांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना टोपे म्हणाले की,राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार लोकहिताची कामे करत आहे. कोरोनानंतर राज्यावर अतिवृष्टीचे संकट ओढवले.पिकांचे मोठे नुकसान झाले. सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली.त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव सरकारला आहे.
गावागावात पाणंद रस्ते करण्यावर भर दिला जाणार असून त्यामुळे शेतरस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.पाणंद रस्त्यासाठी प्रस्ताव दाखल करावेत असे आवाहन टोपे यांनी यावेळी केले.
सरकार व पक्षाचे मजबूत संघटन ही विकास रथाची दोन चाके आहेत त्यामुळे गावपातळीवर पक्षाचे मजबूत संघटन करावे,जनतेची कामे करावीत,राष्ट्रवादी हा लोकांचे काम करणारा पक्ष आहे हे लक्षात ठेवून लोक मतदान करतात हे सांगतानाच राष्ट्रवादीच्या शाखा गावागावात सुरू करा असे आवाहन त्यांनी केले.
उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे,तहसीलदार रूपा चित्रक यांचीही यावेळी उपस्थिती होती.अधिकाऱ्यांनी जनतेची कामे वेळेवर करावीत,काम करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा असेही टोपे म्हणाले.
निम्न्न दुधना प्रकल्पात संपादित करावयाच्या शेतजमिनीचा प्रश्न तसेच सिंचनाचे इतर प्रश्न या संदर्भात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा झाली असून लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल असे टोपे म्हणाले.
कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष सभापती कपिल आकात यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, स्व.बाबासाहेब आकात यांनी सुरू केलेली दीपावली स्नेहमीलन कार्यक्रमाची परंपरा आम्ही पुढे चालू ठेवली आहे.मतदार संघात आकात परिवारावर प्रेम करणाऱ्या स्नेहीजनांची संख्या मोठी आहे.टोपे यांच्या नेतृत्वाखाली विकासाची अनेक कामे सुरू झाली आहेत असे सांगून फळबाग अनुदान, पीकविमा,निम्न्न दुधना प्रकल्प संपादित करावयाच्या शेतजमिनीचा प्रश्न मार्गी लागावा अशी अपेक्षा कपिल आकात यांनी व्यक्त केली. त्यावर आकात यांची मागणी पूर्ण केली जाईल असा उल्लेख ना.टोपे यांनी आपल्या भाषणात केला.
यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ.निसार देशमुख, रमेश सोळंके,विनायक काळे यांचीही भाषणे झाली.
कार्यक्रमाला विलासराव आकात,किसनराव मोरे, कदिर कुरेशी, जमील कुरेशी, सूर्यभान मोरे, मधुकर झरेकर,ओंकार काटे,यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचलन अखिल काजी यांनी केले तर विजय राखे यांनी उपस्थितांचे आभार मानले.